सकाळ वृत्तसेवा
२५ ऑगस्ट २०१०
मुंबई, भारत
रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शहरांतील डॉक्टरांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी, असा आग्रह आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी धरला आहे. काल जे.जे. रुगणालयातील डॉक्टर राजन पालव यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या जवळच्या स्नेह्यांप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातील मंडळीही अस्वस्थ झाली आहेत. पालव यांनी वेळीच स्वतःकडे लक्ष न देता मलेरिया झाल्याचे मानून औषधे घेतली. डेंगीचे निदान होऊन उपचार सुरू होईपर्यंत वेळ निघून गेली होती. कोणत्याही क्षणी मदतीला धावून येणाऱ्या धडपड्या डॉक्टरांना आपण सारेच मुकलो. हे जिवंत उदाहरण डोळ्यापुढे ठेवून साथीच्या या आजारांमध्ये दिवसरात्रीची तमा न बाळगता काम करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःकडेही लक्ष द्यायला हवे, असा आग्रह धरला जात आहे.
डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, कावीळ, स्वाईन फ्लू, व्हायरल फिव्हर अशा अनेक साथींचा फैलाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एरवी काही तास सुरू असणाऱ्या छोट्या दवाखान्यांमध्येही रात्री उशिरापर्यंत गर्दी असते; तर पालिका रुग्णालयेदेखील रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या या रुग्णांवर औषधोपचार करीत असताना डॉक्टरांनाही त्याची मोठ्या प्रमाणात लागण होते. मलेरिया, कावीळ, डेंगीची लागण ही संसर्गातून होत नसली, तरीही एचवनएनवन, व्हायरल फिव्हरचा धोका मात्र डॉक्टरांना; तसेच रुग्णालयांतील इतर कर्मचाऱ्यांनाही होण्याची दाट शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी लस घेणे, एखाद्या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित औषधे घ्यायला हवीत. मात्र तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. स्वाईन फ्लूची लागण होऊ नये यासाठी पालिका रुग्णालयामध्येही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यासाठी दोन हजार लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये ही लसीकरण मोहीम केवळ डॉक्टरांसाठी होती; मात्र त्यातील आठशे लसी पुन्हा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. परिचारिका तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही याचा लाभ घ्यावा म्हणून ओपीडीमध्येही ही व्यवस्था करण्यात आली असली, तरीही त्याला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे.
पालिका रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या या डॉक्टरांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची संख्या खूप मोठी असते. या तरुण मुलांना आपल्याला काही होणारच नाही, असा ठाम विश्वास असतो. त्यामुळे अनेकदा वेळेची उपलब्धता असली तरीही स्वतःच स्वतःला औषध देण्याची पद्धती दगा देऊ शकते, असे चाळीस वर्षांहून अधिक काळ प्रॅक्टिस करणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन्सचे अध्यक्ष डॉ. बकुलेश मेहतांचा अनुभव आहे. साथीचा जोर वाढत असताना मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये मागील महिन्यात सात डॉक्टरांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णांची वाढती संख्या, साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला तरीही स्वतःकडे डॉक्टर दुर्लक्ष करतात, रक्तातून होणाऱ्या संसर्गामुळे एचआयव्हीचीही लागण डॉक्टरांना होते, आपल्या सहकारी डॉक्टर मित्र-मैत्रिणीकडून त्वरित तपासणी करून घ्यावी, असे वारंवार सांगितले जात असले तरीही त्याकडे लक्ष दिले जात नाही; पण साथीची पावले ओळखून वेळीच उपचार केल्यास पुढील धोका निश्चितच टळू शकतो.