सकाळ वृत्तसेवा
१८ मे २०१०
नागपुर, भारत
अपघात झालेल्या रुग्णाच्या उपचारात हयगय केल्याच्या मुद्द्यावरून रुग्णाच्या संतप्त नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गोंधळ घातला. संबंधित बेजबाबदार डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी अजनी पोलिसांकडे केली. या प्रकारामुळे मेडिकलमध्ये मोठा तणाव होता.
किशोर ढोमणे (रा. सोनेगाव) यांचा बुधवारी (ता. 12) बुटीबोरी रेल्वे क्रॉसिंगजवळ दुचाकीने जात असताना अपघात झाला. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 10 मध्ये दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शुक्रवारी (ता. 14) त्यांना वॉर्ड क्रमांक एकमध्ये हलविण्यात आले; परंतु वॉर्ड क्रमांक एकमध्ये दाखल करण्यापूर्वी स्वाक्षरी झाली नसल्यामुळे त्यांना तब्बल पाच तास स्ट्रेचरवर ठेवण्यात आले. काल रविवारी (ता. 16) सायंकाळी साडेसातला त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या छातीवर दाब देऊन कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. नातेवाइकांनी व्हेंटिलेटर लावण्याची मागणी केली असता व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालून संबंधित डॉक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी केली. रात्री उशिरा रुग्णाचा मृतदेह शीतगृहात ठेवण्यात आला. आज (ता. 17) अजनी पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
- Details
- Hits: 3305
0