सकाळ वृत्तसेवा
२६ ऑक्टोबर २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत
आयुर्विमा, औषधांचा दर्जा, रूग्णालयातील सेवासुविधा याविषयी ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागणारे ग्राहक आता स्वतःच्या आरोग्यहक्कांविषयी अधिक जागरूक झाले आहेत. काही मोठ्या शस्त्रक्रियानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या संसर्गाच्या उपचाराची भरपाई मागण्यासाठी ग्राहक न्यायालयाकडे धाव घेत आहे. या तक्रारींचे व त्यामूळे द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईचे प्रमाण दांडगे असले तरीही शहरांतील रुग्णालयांनी मात्र अजूनही संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. याउलट या संसर्गाची जबाबदारी रुग्णालयांची नाही, असे सांगून त्यातून पळवाटाही शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
इंजेक्शन दिल्यानंतर राहिलेले व्रण, होणारी जखम, शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाच्या पोटात राहून गेलेला कापसाचा बोळा, कापड अथवा एखादे उपकरण तसेच जखम भरून न येणे, त्यात पाणीसदृश्य द्रव निर्माण होणे, अशा विविध कारणांसाठी आता अनेक रुग्ण ग्राहक न्यायालयांची मदत घेत आहेत. केवळ शस्त्रक्रियेच्या दरम्यान आकारल्या जाणाऱ्या अवाजवी खर्चासाठीच यापूर्वी असे दावे दाखल केले जात. मात्र, आता आरोग्यहक्कांनुसार योग्य पुराव्यांसहित या तक्रारींची योग्य दखल घेतली जात आहे. मोठी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ऑपरेशन थिएटरमधील स्वच्छता, उपकरणांचे निर्जंतुकीकरण, वापरण्यात येणारी औषध, त्यासाठी रुग्णांना असणारी ऍलर्जी या तपासण्या डॉक्टरांनी करून घेणे आवश्यक आहे. त्यावेळी एखादी साथ असल्यास रुग्णालयातील अन्य रुग्णांना त्यांचा संसर्ग होऊन अधिक गुंतागुंत निर्माण होणार नाही, हेदेखील रुग्णालयांनी पाहणे बंधनकारक असते. मात्र प्रतिजैविकांचा अनावश्यक मारा करून या महत्त्वाच्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करण्याचा अनेक डॉक्टरांचा कल असतो. त्यामूळे शस्त्रक्रिया झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गाना रुग्ण बळी पडतात. त्यामुळे विवाह मोडण्यापासून पुन्हा अपत्यप्राप्ती होण्यापर्यंतच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्याबाबत आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो याचीही अनेकदा रुग्णांना कल्पना नसते. मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयाच्या विरोधात असेच एक प्रकरण सध्या ग्राहक न्यायालयात सुरु आहे. एका महिलेने शस्त्रक्रियेनंतर झालेल्या संसर्गाची जबाबदारी रुग्णालयाची आहे, त्यामूळे त्याबाबत वैद्यकीय उपचार द्यावेत, असा दावा दाखल केला आहे. ही लढाई पाच वर्ष सुरु आहे.
अशा प्रकारच्या दाव्यातील कायदेशीर वैद्यकीय पुरावे योग्य प्रकारे दाखल करावेत, असे ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते सांगतात. रुग्णास झालेला संसर्ग हा त्या रुग्णालयातून झालेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्या रुग्णाकडे संबधित व्याधीबाबतचा तपशील, घेत असणारी औषधे, झालेल्या तपासण्या यांची इत्यंभूत माहिती असणे अपेक्षित असते. या प्रकारच्या प्रकरणांत कायद्यातील तरतुदीनुसार तज्ज्ञ डॉक्टरांनी हा संसर्ग नेमका कशामुळे झालेला आहे, याचा पाहणी अहवाल रुग्णास द्यावा लागतो. पण, अनेक डॉक्टर आपल्याच समूहांतील इतर डॉक्टरांविषयी अशी माहिती देत नाहीत. त्यामुळे रुग्णाला ते सिद्ध करणे महत्कठीण होते, असा अनुभव ऍड. प्रभावळकर सांगतात. या संसर्गाची शहानिशा करण्यासाठी रुग्ण मुंबईतील संसर्ग नियंत्रण समितीकडूनही पाहणी करतात. समितीने तसे प्रतिज्ञापत्र दिल्यास तो पुरावा ग्राह्य ठरतो. अशा प्रकरणांत मोठ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात रुग्णास दाद मागता यावी यासाठी राष्ट्रीय ग्राहक हक्क आयोगाच्या नियमावलीनुसार ते प्रकरण सरकारी रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडेही पाहणीसाठी पाठवले जाते.