सकाळ वृत्तसेवा
०८ जुलै २०१०
मुरबाड ग्रामीण, भारत
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचे अर्भक उपचारांअभावी दगावल्याची घटना मंगळवारी (ता.6) मुरबाड ग्रामीण रुग्णालयात घडली. या महिलेच्या प्रसूतीची जबाबदारी ज्या डॉक्टरांवर होती तेच डॉक्टर या वेळी रुग्णालयात गैरहजर असल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणानेच या अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
तालुक्यातील रावगाव येथील संध्या दशरथ कडव या सोमवारी (ता. 5) दुपारी तीनच्या सुमारास मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्या दाखल होताना त्यांच्यावरील सर्व उपचारांची जबाबदारी डॉ. रवींद्र चव्हाण यांच्यावर होती. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास संध्या यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या; मात्र या वेळी रुग्णालयात नर्सव्यतिरिक्त कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता. दरम्यान, या महिलेची प्रसूती झाल्यावर रुग्णालयातील परिचारिका एस. एस. मते यांनी बाळाला उपचारासाठी पुढे पाठविण्यास सांगितले. कडव कुटुंबीयांना बाळाला कल्याण येथील इटकर यांच्या दवाखान्यात नेले; मात्र बाळ आधीच मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. यानंतर नातेवाईकांनी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात येऊन या प्रकाराचा डॉक्टरांना जाब विचारला असता नातेवाईकांशीही रुग्णालयातील या नर्सने अरेरावीची भाषा केली. या प्रकरणी कडव यांच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर व नर्स यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन तत्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू
- Details
- Hits: 2961
0