सकाळ वृत्तसेवा
०९ सप्टेंबर २०१०
खडकी, भारत
बोपोडी, पुणे-मुंबई रस्ता या भागामध्ये डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या भागातील अनेक नागरिक या आजारामुळे त्रस्त आहेत. या भागातील काही डॉक्टर व औषध विक्रेत्यांनाही या आजाराने ग्रासले असल्याची माहिती समोर आली आहे.
बोपोडीत गेल्या महिनाभरात डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची वृत्ती वाढली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाभाविकच डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे गेल्या महिनाभरापासून या भागातील सर्व रुग्णालये व औषधविक्रीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र, काही डॉक्टर व औषध विक्रेत्यांनाही डेंगी व चिकुनगुनियाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत औंध क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी जयंत भोसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, बोपोडी व या भागातील पुणे-मुंबई रस्त्यावर औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे; तसेच साफसफाई सुरू करण्यात येणार आहे. मात्र, डेंगीचे डास स्वच्छ पाण्यामध्ये वाढत असल्यामुळे नागरिकांनीही थोडी काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली
- Details
- Hits: 2909
0