सकाळ वृत्तसेवा
०४ मे २०१०
दिलीप कुऱ्हाडे
पुणे, भारत
यंदा (1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2010 पर्यंत) राज्यातील डेंगीच्या एकूण दोन हजार तीनशे रुग्णांपैकी तब्बल 856 रुग्ण केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतच आढळून आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने ही संख्या वाढली असून, पायाभूत सोयीसुविधा आणि पुरेशा मनुष्यबळाअभावी ही स्थिती उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा अहवाल राज्य हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग विभागाने दिला आहे. हिवताप जनजागृती आणि उपाययोजनेसाठी आवश्यक नोकरभरतीत करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे डेंगीचे रुग्ण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. के. नागकुमार यांनी पुरेसे कर्मचारी असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कीटकजन्य रोग (हिवताप, डेंगी, चिकुनगुन्या, चंडीपुरा व हत्तीरोग) प्रतिबंध व नियंत्रणासाठी डास, अळी, डास घनता नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी कीटकनाशक फवारणी केली जाते. राज्यातील निवडक महापालिका आणि नगरपालिका हद्दीत केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या कीटकनाशक व अळीनाशकांचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर अशा नवीन अस्तित्वात आलेल्या महापालिकांना कीटक रोग नियंत्रणासाठी त्यांच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी लागते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नोकरभरतीच्या वादात असा कीटकरोग नियंत्रण कार्यक्रम झालेलाच नाही. त्यामुळे या वर्षात राज्यातील एकूण दोन हजार तीनशे डेंगी रुग्णांपैकी 856 रुग्णांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत झाली आहे. त्यात पुणे महानगरपालिका हद्दीतील 103 आणि पुणे जिल्ह्यातील 115 रुग्णांचा समावेश आहे. मागील वर्षी ही प्रत्येकी 36 होती. मागील वर्षी एकूण रुग्णांची संख्या 438 इतकी नोंदविण्यात आली होती. कीटकरोग नियंत्रणात अडीच चौरस किलोमीटर परिसरासाठी दोन कर्मचारी आणि एक पर्यवेक्षक असणे आवश्यक आहे. तसेच, मनुष्यबळ, मूलभूत सोईसुविधा, कीटकनाशक आदींसाठी महापालिकेला प्रत्येक वर्षी किमान एक कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दिवसेंदिवस डेंगी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याबाबत डॉ. नागकुमार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकामे चालू आहेत. त्यामुळे डेंगीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून डेंगीवर नियंत्रण आणले आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण
2009-2010 या वर्षात मुंबई मध्ये 48 जणांना डेंगीचा प्रार्दुभाव झाला होता. ठाणे (111), नाशिक (76), अहमदनगर (174), कोल्हापूर (110), सांगली (70), औरंगाबाद (59), बीड (51), नवी मुंबई (127), नागपूर (85), भंडारा (58), हे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांत वीसच्या आत रुग्णांची संख्या आहे.
डेंगीच्या रुग्णांत पिंपरी-चिंचवड आघाडीवर
- Details
- Hits: 3730
0