सकाळ वृत्तसेवा
२८ मे २०१०
यवतमाळ, भारत
उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे नाइलाजास्तव नागरिकांना मिळेल ते पाणी प्यावे लागत आहे. या पाण्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी डायरिया आणि गॅस्ट्रोसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. यात 1 मे ते 25 मे या 25 दिवसांच्या काळातच तीन रुग्णांचे बळी गेले आहेत.
गेल्या काही वर्षात पर्जन्यमानाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. यातच यावर्षी अगदी नगण्य प्रमाणात पाऊस पडल्याने जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्यापुरतेही शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत अनेक भागात दूषित पाण्याचा किंवा फ्लोराईडयुक्त पाण्याचाही पिण्यासाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे दूषित पाणी प्राशन केल्याने डायरिया आणि गॅस्ट्रोसारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
डायरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ, जिल्हा रुग्णालयात दररोज उपचाराकरिता येणाऱ्या 20 ते 25 रुग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या तब्बल 85 रुग्णांना 1 मे ते 25 मे या काळात उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयातील आयसूलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. तर, याच आजाराने याच 25 दिवसांच्या कालावधीत तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सर्वसाधारणपणे दर महिन्याला या आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एप्रिल आणि मे या दोन महिन्यात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करण्याकरिता शासकीय रुग्णालयातच नव्हे तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालयातही यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळून येत आहे.