Print
Hits: 3360

सकाळ वृत्तसेवा
३० जुलै २०१०
ठाणे, भारत

मुंबईसह ठाण्यात 'वायवॅक्‍स'च्या मलेरियाने थैमान घातले आहे. महापालिका हद्दीतही तापाची साथ आली असून मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे चार हजार रुग्ण मलेरियाने आजारी असल्याची नोंद करण्यात आली असून साथरोगांनी अवघा जिल्हा आजारी पडला आहे. ठाणे शहरातील साथ पंधरा दिवसांत आटोक्‍यात आणण्याचे ध्येय महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन ताप आलेल्या रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात केवळ 150 मलेरिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इतर वेळीही मलेरियाच्या रुग्णांची सरासरी 150 असते. अशा वेळी पावसाळ्यात तापाची साथ वाढत असतानाही जून महिन्यात ठाण्यात केवळ 150 रुग्णांची नोंद झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ही बाब आहे. घरच्या घरी मलेरियावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या हजारांवर पोचली आहे. जुलै महिन्याची महापालिकेची आकडेवारी अद्याप जमा करण्यात आलेली नाही; परंतु तीही दुप्पट असल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

दिवसाला दोनशे घरांचे ध्येय
तापाच्या साथीवर मात करण्यासाठी 100 पारिचारिका, 16 मल्टिपर्पज कर्मचारी आणि मलेरिया निर्मूलन कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. मलेरियाची साथ जास्त असलेल्या विभागांवर सुरुवातीला लक्ष केंद्रित केले आहे. या विभागांतील घराघरांत जाऊन ताप आलेल्या रुग्णांच्या रक्ताचा नमुना घेतला जाणार आहे. या नमुन्याची तपासणी तात्काळ उपलब्ध असलेल्या पाच लॅबमध्ये केली जाणार आहे. त्यात एखादा मलेरियाचा रुग्ण आढळल्यास "क्‍लोरोक्विन' आदी औषधे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसाला दोनशे घरांमधील रुग्णतपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. विभागांत धूरफवारणी आणि औषधफवारणी होत असल्याचा दावाही केंद्रे यांनी केला आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.