सकाळ वृत्तसेवा
२७ मे २०१०
दिलीपकुमार चिंचकर
सातारा, भारत
जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील गंभीर आजारी मुलांना आता उपचाराअभावी तळमळावे लागणार नाही. सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका घेऊन जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या माताबाल विकास ट्रस्टच्या वतीने यंदाही दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या सहा वर्षांपर्यंतच्या 90 बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी या ट्रस्टला जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या एक दिवसाचे वेतनातून 87 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यासाठी 23 लाख चार हजार रुपये खर्च केले गेले होते. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातूनही मोफत उपचार केले जातात. मात्र, आजार गंभीर असल्यास सर्व सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार करावे लागतात. हृदयाची शस्त्रक्रिया करावयाची झाल्यास लाखो रुपये खर्च करावे लागतात. सामान्य कुटुंबांना असा खर्च झेपत नाही. अनेक वेळा उपचाराअभावी त्यांची आबाळ होते. गरीब कुटुंबातील लहान मुलांना अशा अवस्थेला सामोरे जावे लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेने आता खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका घेतली आहे. मोफत आरोग्य उपचाराच्या आणि इतर योजना असल्या, तरीही मोठ्या स्वरूपाचा खर्च करण्यात जिल्हा परिषदेला मर्यादा येतात. मात्र, गरीब घरातील मुलांना उपचार मिळालेच पाहिजेत, या उद्देशाने जिल्हा परिषदेने हा उपक्रम राबविला आहे. जिल्ह्यात शालेय आरोग्य तपासणी मोहीम आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबविली जाते, तसेच अंगणवाडी सेविकाही घरोघरी जाऊन अशी तपासणी करत असतात. या तपासणीत अनेक मुलांना हृदयरोगासारखे गंभीर आजार असल्याचे दृष्टोत्पत्तीस आले. मात्र, गरीब कुटुंबातील मुलांच्या पालकांना त्यासाठी खर्च करणे शक्यच नव्हते, अशी गेल्या वर्षी 84 मुले आढळली होती. या मुलांची पुणे येथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तपासणी केली. या मुलांवर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. 30 ते 35 लाख रुपये त्यासाठी आवश्यक होते. प्रश्न पैशाचा होता. त्यानुसार जिल्हा परिषदेत याबाबत विचार केला गेला. या उपचारांच्या खर्चासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. त्यासाठी जिल्हा परिषदेने "माता- बाल विकास संस्था' स्थापन केली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव कडू- पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. या चांगल्या कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार दिला. त्यातून तीन लाख रुपये जमा झाले. निधी गोळा होत गेला. रूबी हॉस्पिटलनेही शस्त्रक्रियेच्या खर्चात काही सवलत दिली. त्यातून या शून्य ते सहा वयोगटातील 87 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या वर्षी दुर्धर आजाराने ग्रस्त 90 बालके आढळली आहेत. त्यांच्यावरही शस्रक्रिया केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेने सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका घेऊन गरीब कुटुंबातील मुलांना दिलासा दिला आहे.
अध्यक्षांचे आवाहन
दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या 90 मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार, तसेच पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. ज्योती जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद करणार बालकांच्या शस्त्रक्रिया
- Details
- Hits: 2979
0