सकाळ वृत्तसेवा
१० जुलै २०१०
नाशिक, भारत
जागेपणी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची किमया नाशिकच्या साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ऍण्ड रिसर्च सेंटर या रुग्णालयात करण्यात आली. डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया झाली.
5 जुलैस प्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ. अभयसिंह वालिया व कार्डियाक ऍनेस्थेटिस्ट डॉ. चंद्रशेखर खैरनार (भूलतज्ज्ञ) यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. ही "अवेक' शस्त्रक्रिया 61 वर्षीय रुग्ण सौ. जयश्री गिरोला या महिला रुग्णावर करण्यात आली. मानेच्या मणक्यातून देण्यात येणारी भूल या आधुनिक व अतिशय कौशल्य पणाला लावणाऱ्या भूलतंत्राचा वापर या शस्त्रक्रियेसाठी करण्यात आला. ज्या रुग्णाचे फुफ्फुस, मूत्रपिंड अशक्त झालेले असते. डायबेटिस, मायस्थेनिया ग्रेव्हिस व इतर काही आजार झालेल्या रुग्णांना ती विशेष फायदेशीर ठरते. सौ. जयश्री गिरोला यांना फुफ्फुसाचा आजार असल्याने पूर्ण भूल देणे अतिशय धोकादायक होते. मानेच्या मणक्यातून दिलेल्या भुलीद्वारे फक्त छातीचाच भाग बधिर करण्यात आला होता. त्या पूर्णपणे जागृत अवस्थेतच होत्या. "ऑक्टोपस' या उपकरणाद्वारे हृदय बंद न पाडता ही शस्त्रक्रिया करण्यात आली. हार्ट लंग मशिनचा वापर या वेळी कटाक्षाने टाळण्यात आला.
तसेच इतर रुग्णांच्या शस्त्रक्रियेनंतर लागणारे व्हेंटिलेटर व त्याद्वारे होणारे दुष्परिणामही टाळण्यात आले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर लवकरात लवकर पुन्हा कार्यमग्न होणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी तसेच विविध प्रकारचे जुने आजार असलेल्या रुग्णांसाठी "अवेक' शस्त्रक्रिया वरदान ठरू शकते, असे मत डॉ. धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. दराडे, डॉ. प्रभू व सौ. श्रीमती कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.