सकाळ वृत्तसेवा
०३ मे २०१०
चेन्नई, भारत

जीवन-मरणाच्या रेषेवर झुंजणा-या श्वानांना आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. दुर्धर आजाराशी सामना करणा-या श्वानांसाठी गेल्या आठवड्यात देशातील पहिलीच रक्तपेढी स्थापन करण्यात आली आहे. तमिळनाडू पशू वैद्यकीय आणि पशू विज्ञान विद्यापीठातील केंद्रातून या पेढीचे काम चालणार आहे.
या संदर्भात बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. थंगराजू म्हणाले, की २८ श्वान मालकांनी रक्त देण्याचे मान्य केले आहे. एक आठवड्यापूर्वी ही रक्तपेढी स्थापन झाली असून, आतापर्यंत दहा श्वानांचे रक्त बदलण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. एर्लिशिया कॅनिस यासारख्या रोगाच्या संसर्गामुळे श्वानांना रक्त देण्याची गरज भासते. या रोगामुळे श्वानांच्या रक्तातील घटक नष्ट होऊ लागतात.
श्वानांच्या रक्ताचे एकूण आठ गट असून, त्यापैकी डीईए १.१ निगेटीव्ह हा गट महत्त्वाचा आहे. या गटाचे रक्त कोणत्याही गटाच्या श्वानांना देता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. एस. प्रथबन म्हणाले, की प्रयोगशाळेत रक्त संकलन, तपासणी आदी सर्व सुविधा असून, रक्त साठवणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे.