सकाळ वृत्तसेवा
०७ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत
किशोर वयातील मुला-मुलींना लैंगिक आणि आरोग्याच्या प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे "मैत्री क्लिनिक' सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हे "क्लिनिक' सुरू करण्यात येणार असून, या प्रत्येक केंद्रासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली.
किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील वयात लैंगिक आणि आरोग्याच्या विविध समस्यांवर शास्त्रीय माहिती मिळणे आवश्यक आहे; अन्यथा त्याचा दूरगामी गंभीर परिणाम आरोग्यावर होतो. भावी आयुष्यात निरोगी आणि सुदृढ वाटचालीसाठी "मैत्री क्लिनिक' सुरू करण्यात येत आहेत.
आरोग्य खात्याचे अतिरिक्त संचालक डॉ. उद्धव गावंडे "सकाळ'ला अधिक माहिती देताना म्हणाले, ""राज्यातील चार जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन तालुक्यांतील दोनशे गावांमध्ये हे "क्लिनिक' सुरू करण्यात येत आहे. त्यात दहा ते अठरा वयोगटील मुला-मुलींना सहभागी होता येईल. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्यांना यात सहभागी होता येईल. यात सहभागी होणारी मुले एकाच घरातील नसावीत. या प्रत्येक केंद्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने "प्रसूती आणि बालआरोग्य' (आरसीएच) प्रकल्पात याचा समावेश केला आहे.''
लग्न लहान वयात करण्याचे प्रमाण अद्यापही राज्याच्या काही भागात आहे. या माध्यमातून मुलींमध्ये याबाबत जागृती करण्यात येणार आहे. सुरक्षित गर्भपात, असुरक्षित प्रसूती अशा समस्या या यातून सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा आणि स्त्री रुग्णालयांमध्ये "मैत्री क्लिनिक' सुरू होणार आहेत. त्यासाठी रुग्णालयातील स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. "आरोग्य समन्वय समिती'ची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे. तीन महिन्यांतून एकदा या समितीची सभा घेण्यात येणार असल्याचे डॉ. गावंडे यांनी सांगितले. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी 75 हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चार जिल्ह्यांत "मैत्री क्लिनिक' सुरू करणार
- Details
- Hits: 3284
1