सकाळ वृत्तसेवा
०४ मे २०१०
मुंबई, भारत
दुर्गम भागात जाणवणारी डॉक्टरांची चणचण दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रे नसलेल्या भागात फिरते दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. आदिवासीबहुल लोकसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये असे दवाखाने काही वर्षांपासून नवसंजीवन या योजनेंतर्गत सुरू असून, उर्वरित भागासाठीही हा उपक्रम राबवला जाईल. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मोबाईल युनिट सज्ज ठेवून आठवड्यातील विशिष्ट दिवशी एकेका गावामध्ये हा दवाखाना पाठवावा, अशी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची योजना आहे.
दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पुरवणे ही सरकारची जबाबदारी असून, ती पार पाडण्यासाठी नव्या मार्गांचा अवलंब केला जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात 40 फिरते दवाखाने उभारण्यात येणार असून, 33 जिल्ह्यांमध्ये अशा युनिटची विभागणी केली जाईल. मोठ्या जिल्ह्यांमध्ये फिरती रुग्णालये असलेल्या दोन गाड्या ठेवल्या जातील. एका प्रशिक्षित डॉक्टरच्या नेतृत्वात परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक आणि एक सेवक असा चार ते पाच जणांचा एका फिरत्या दवाखान्यात समावेश केला जाईल. भारतातल्या काही राज्यांमध्ये यापूर्वीच अशी सोय सुरू आहे. वैद्यकीय सेवांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
ग्रामीण भागात आता फिरते दवाखाने
- Details
- Hits: 3611
0