Print
Hits: 2606

सकाळ वृत्तसेवा
१२ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत

आपत्कालीन स्थितीत किंवा अपघातानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 19 रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज यंत्रणा उभारण्यात येत आहे. ही यंत्रणा पोलिस नियंत्रण कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात असल्याने या रुग्णालयांमधून वीस मिनिटाच्या आत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकेल.

घटना घडल्यानंतर गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्यावर पहिल्या तासात उपचार सुरू करणे आवश्‍यक असते. या कालावधीला "गोल्डन अवर' म्हणतात. नेमका याच कालावधीत अनेकदा रुग्णांना ससून अथवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी बराच वेळ वाया जातो. काही वेळा उपचाराअभावी रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील मोठ्या रुग्णालयांमधील यंत्रणा सर्वांच्या साह्यासाठी त्वरित उपलब्ध करण्याच्या दृष्टीने योजना आखली. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण जामकर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनाच्या दोन बैठका झाल्या आहेत. या व्यवस्थापनांनी योजनेला मान्यता दिली आहे.

जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी ही माहिती बुधवारी दिली. ते म्हणाले, ""पुणे व पिंपरी चिंचवडचा भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन विविध भागातील रुग्णालयाचा समावेश या योजनेत करण्यात आला. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर किंवा दुर्घटना घडल्यानंतर तेथे तातडीने वैद्यकीय साह्याची आवश्‍यकता भासते. निवडण्यात आलेल्या रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. डॉक्‍टर, त्यांचे वैद्यकीय सहायक आणि अन्य कर्मचारी अशी वीस जणांची नियुक्ती या कक्षात करण्यात येईल. तेथे सुसज्ज रुग्णवाहिका असेल. घटना घडल्यानंतर, ही रुग्णवाहिका डॉक्‍टरांसह 20 मिनिटांत घटनास्थळी पोहोचेल. आवश्‍यकतेनुसार तेथे प्राथमिक उपचारानंतर रुग्णांना रुग्णालयात पाठविले जाईल. त्यामुळे रुग्णांवर चाळीस मिनिटांच्या आत उपचार सुरू करता येतील. आवश्‍यकता भासल्यास, त्या भागातील अन्य रुग्णालयाचे साह्य घेता येईल. प्राथमिक उपचारानंतर गरज भासल्यास, संबंधित रुग्णांना ससून किंवा यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येईल.''

""प्रत्येक रुग्णालयात एक समन्वयक असेल, तसेच एक हेल्पलाइन असेल. त्यांचे दूरध्वनी क्रमांक पोलिस नियंत्रण कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागात उपलब्ध असतील. त्यामुळे घटनेची माहिती समजताच त्या भागातील वैद्यकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचेल आणि त्वरित उपचार सुरू होतील. यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातातील रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होईल.''

""मोठी दुर्घटना घडल्यास विकेंद्रित पद्धतीने शहराच्या सर्व भागात असलेल्या रुग्णालयाच्या साह्याने रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, या उद्देशाने ही योजना आखली आहे. संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत आणखी चर्चा केल्यानंतर, लवकरच ही योजना सुरू होईल,'' असे दळवी यांनी सांगितले.

प्रभागाचे नाव रुग्णालयाचे नाव
संगमवाडी, लोहगाव कटारिया रुग्णालय येरवडा जहांगीर रुग्णालय ढोले पाटील प्रभाग रुबी हॉल नर्सिंग होम पुणे कॅन्टोन्मेंट इन्लॅक बुधराणी रुग्णालय हडपसर नोबेल रुग्णालय बिबवेवाडी भगली रुग्णालय सहकारनगर युनिटी रुग्णालय भवानीपेठ केईएम रुग्णालय टिळक रस्ता पूना रुग्णालय धनकवडी भारती रुग्णालय कसबा पेठ कमला नेहरू रुग्णालय घोले रस्ता दीनदयाळ रुग्णालय कर्वे रस्ता सह्याद्री रुग्णालय औंध मेडिपॉइंट रुग्णालय वारजे, कर्वेनगर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चिंचवड निरामय रुग्णालय पिंपरी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज थेरगाव आदित्य बिर्ला रुग्णालय निगडी प्राधिकरण लोकमान्य रुग्णालय

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.