सकाळ वृत्तसेवा
१६ जुन २०१०
सांगली, भारत
जिल्ह्यात अवैधपणे वैद्यकीय व्यावसायिकांकडून करण्यात येणाऱ्या गर्भलिंग चिकित्सेला आळा घालण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर एक सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे. ते जिल्ह्यातील सर्व सोनोग्रॉफी केंद्रांना ऑनलाईन जोडण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. त्यावेळी या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी श्याम वर्धने, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन मुद्गल यांच्या उपस्थितीत दाखवण्यात आले. सॉफ्टवेअर बसविल्यानंतर सदर सोनोग्राफी यंत्रावर तपासल्या जाणाऱ्या सर्व रुग्णांच्या माहितीची नोंदणी होईल. आता सोनोग्राफी व्यवसायिकांना जो "एफ' फॉर्म भरावा लागतो, तो या व्यवस्थेत संगणकावर ऑनलाईन भरता येईल. प्रत्येक सोनोग्रॉफी मशिनला एक, "सायलेंट ऑबझर्व्हर' बसविण्यचीही या सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्था आहे. त्यात रुग्णाच्या सोनोग्रॉफीचे रेकॉर्डिंग होईल. यामुळे शासनाला दिलेला सोनोग्रॉफीचा तपशील व प्रत्यक्षपणे केलेल्या सोनोग्रॉफी यात व्यावसायिकाला तफावत करता येणार नाही. यासंबंधीचा तपशील तालुकास्तरावरील वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा स्तरावरील शल्यचिकित्सकाला केव्हाही पाहण्यासाठी उपलब्ध असू शकेल. जिल्हाधिकारी वर्धने यांनी या सॉफ्टवेअरद्वारे गर्भलिंग चिकित्सेला प्रभावीपणे आळा घालता येणार असल्याने जिल्ह्यात ते तत्काळ बसवून कार्यान्वित करवून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. सी. महाजन, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, जिल्हा सरकारी वकील ऍड. अशोकराव वाघमोडे, सौ. मालन मोहिते, मोहनराव पाटील व संबंधित ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.