सकाळ वृत्तसेवा
०१ ऑक्टोबर २०१०
मुंबई, भारत
देशातील शहरी तसेच ग्रामीण भागातल्या रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार गर्भपात इच्छुकांमध्ये 27 ते 30 टक्के किशोरवयीन मुली असतात असे आढळले आहे. जगभरात दरवर्षी सुमारे 4.2 कोटी स्त्रिया नको असताना गर्भधारणा झाल्याने गर्भपात करतात, असेही या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया व बायर स्किरिंग फार्मा यांच्या वतीने नुकतीच जागतिक संततिप्रतिबंधक दिनाची घोषणा करण्यात आली. तसेच या दिनाच्या निमित्ताने (26 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय जनजागृती अभियानाचा प्रारंभही करण्यात आला. नको असलेल्या गर्भधारणेला प्रतिबंध करण्यासाठी मोहीम उभारण्याचा मनोदय या वेळी व्यक्त करण्यात आला. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये कुटुंबनियोजन आणि गर्भनिरोधक साधनांबद्दल अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी हा यामागील हेतू आहे. तसेच प्रत्येक गर्भधारणा ही ऐच्छिक असावी हे या अभियानाचे ध्येय निर्धारित करण्यात आले आहे.
सर्व्हेक्षणातील निष्कर्षानुसार देशाच्या लोकसंख्येत 25 वर्षांहून कमी वयाच्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी कित्येक तरुणांना लैंगिक ज्ञान तसेच गर्भधारणेबद्दल अत्यल्प माहिती असते किंवा अजिबातच माहिती नसते; त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणेचे प्रमाण वाढत आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार गर्भनिरोधक साधनांचा वापर न केल्यामुळे दरवर्षी 5.1 कोटी नको असलेल्या गर्भधारणा होतात. अन्य 2.5 कोटी गर्भधारणा गर्भनिरोधक साधनांचा अनियमित आणि अयोग्य वापर केल्यामुळे होतात. देशात दरवर्षी 60 लाख गर्भपात केले जातात. त्यापैकी 20 लाख गर्भपात हे नैसर्गिक कारणांमुळे झालेले असतात; तर 40 लाख गर्भपात औषधे देऊन किंवा शस्त्रक्रिया करून करविले जातात. यापैकी बहुतांश बेकायदा गर्भपात हे असुरक्षित असून अस्वच्छ ठिकाणी केले जातात. या वर्षीपासून भारतातही जागतिक संततिप्रतिबंधक दिनाचा प्रारंभ करण्यात आला आहे. पती-पत्नीला हवे असलेले मूल अपघाताने झालेले नसावे; तर त्यांना हवे तेव्हाच झाले पाहिजे यावर आमचा विश्वास आहे, असे मत बायर कंपनीचे विभागीय प्रमुख एंजल मायकेल इव्हॅन्जलिस्टा यांनी व्यक्त केले.
गर्भपात इच्छुकांमध्ये 30 टक्के किशोरवयीन मुली
- Details
- Hits: 3385
0