सकाळ
१७ मे २०१०
कुडाळ, भारत
सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर ही सबंध सिंधुदुर्गाच्या इतिहासातील अपूर्व व अभिमानाची घटना आहे. भविष्यात ए टू झेड सेवांनी परिपूर्ण असणारे डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन माजी केंद्रीय नियोजन मंडळ सदस्य तथा विद्यमान खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज कुडाळात केले. दरम्यान, गरिबांना उपलब्ध करून देणाऱ्या सेवेत मुंबई कोलमडत असून राज्य शासन काहीही करीत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गात आरोग्य क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या अडीच कोटींच्या महत्त्वाकांक्षी रेडिओलॉजी सेंटरचे उद्घाटन आज सायंकाळी डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते झाले. कुडाळ हायस्कूलनजीक मैत्री पार्क या प्रशस्त जागेत हा भव्य प्रकल्प साकारला आहे. येथील (कै.) बाबा वर्दम स्मृती रंगमंचावर आयोजित कार्यक्रमात डॉ. मुणगेकर म्हणाले, पाच संस्थापक एकत्र येऊन हा भव्य प्रकल्प उभा केला हे कौतुकास्पद आहे. रेडिओलॉजी सेंटर हे सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये अपूर्व व अभिमानाची घटना आहे. सर्वसामान्य गरिबांना आरोग्यसेवा कशी मिळेल, या दृष्टीने प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे. भविष्यात हे सेंटर ए टू झेड सुविधेने परिपूर्ण होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, या सेंटरचे शेअर्स उचलून सर्वांनी सहकार्य करावे. आज जिल्ह्यात सर्वप्रथम ही सेवा उपलब्ध होत आहे. या सेंटरसाठी वैयक्तिक एक लाखाची मदत जाहीर केली.
आमदार तेली म्हणाले, सिंधुदुर्गातील आरोग्यसेवेत फरक आहे, जी गोष्ट कमी होती त्याची पूर्तता पाच संस्थापकांनी केली. आता गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवावे लागणार नाही.
पालकमंत्री नारायण राणे यांनी या सेंटरला शुभेच्छा दिल्या. आमदार उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही सेवा महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांनी सेंटरने आरोग्य क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातही भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष संदेश निकम, डॉ. जिंदाल, डॉ. दीपक पाटकर यांनी या सेंटरला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात डॉ. नंदन सामंत यांनी सिंधुदुर्गात रेडिओलॉजी सेंटरची गरज सांगितली. डॉ. श्रुती सामंत यांनी ईशस्तवन सादर केले. डॉ. भालचंद्र मुणगेकर, डीन गोवा मेडिकल कॉलेजचे डॉ. व्ही. एन. जिंदाल, नानावटी हॉस्पिटलचे डॉ. दीपक पाटकर, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन तेली, आमदार परशुराम उपरकर, सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष संदेश निकम यांचा सेंटरचे संस्थापक डॉ. अजय स्वार, डॉ. विवेक रेडकर, डॉ. नंदन सामंत, ऍड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. सीए सौदागर यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. संजय निगुडकर, अनिल साखळकर, पप्पू नाईक, अनिल पाटकर, ऍड. सुभाष देसाई, सुनील जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.