सकाळ वृत्तसेवा
१० जुन २०१०
ठाणे, भारत
कर्करोग उपचारासाठी राज्यातील सहा जिल्ह्यांत सुसज्ज कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे; तसेच राजीव गांधी जीवनदायी योजनेला नवे रूप देऊन खासगी रुग्णालयातही जनेतला विविध रोगांवर मोफत उपचार देणारी जीवनदायी योजना रायगड, नांदेड, गडचिरोली, सोलापूर, धुळे आदी जिल्ह्यांमध्ये लागू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी बुधवारी (ता.9) येथे दिली.
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात कर्करोग रुग्णांसांठी 21 बेडच्या इकॉनॉमी (अल्पदरातील) विभागाचे उद्घाटन आरोग्यमंत्री शेट्टी यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक, उपमहापौर मनोज लासे, ज्युपिटर रुग्णालयाचे सीईओ अजय ठक्कर, डॉ. नवीन दावडा, डॉ. भास्कर शहा आदी उपस्थित होते.
राजीव गांधी योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या जीवनदायी योजनेची माहिती देताना शेट्टी म्हणाले, की ही योजना पांढरी शिधापत्रिकाधारक वगळून सर्वांसाठी आहे. या योजनेत प्रत्येक परिवाराला एक हेल्थ कार्ड देण्यात येईल; तसेच संपूर्ण परिवाराचे छायाचित्र यात असेल. जे रुग्ण हे कार्ड घेऊन खासगी रुग्णालयात जातील त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येतील; तसेच या रुग्णांचे पैसे बारा तासांत रुग्णालयाला मिळणार आहेत, त्यामुळे कोणताही रुग्ण हा उपचाराविना राहणार नाही. यात प्रसूती सोडून जवळजवळ 290 रोगांचा समावेश असणार आहे. ही योजना रायगड, नांदेड, गडचिरोली, सोलापूर या जिल्ह्यांत सुरू करण्यात येणार आहे; तसेच अमरावती, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी सुसज्ज कर्करोग रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालय यात खूपच फरक आहे. ही रुग्णालयेही सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; तसेच या रुग्णालयातील सर्व कामांचे कंत्राट हे व्यावसायिक कंपनीला देण्याचा प्रस्ताव आहे; तसेच रुग्णांना देण्यात येणारे जेवणही बाहेरून मागविण्यात येणार असून लवकरच त्याची निविदा काढण्यात येणार आहे. या वेळी शेट्टी यांनी ज्युपिटर रुग्णालयाची पाहणी केली. ज्युपिटर फाउंडेशनच्या मदतीने 21 बेडचा इकॉनॉमी विभाग तयार करण्यात आला आहे. यात अतिशय कमी दरामध्ये दरवर्षी सर्वसाधारणत: एक हजार कर्करोगासंबंधित शस्त्रक्रिया केल्या जातील; तसेच अन्य एक हजार कर्करोग रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी उपचारात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. स्थानिक रुग्णांना आणि आंतरराष्ट्रीय रुग्णांना दिले जाणारे उच्च दर्जाचे उपचारच रुग्णांना दिले जाणार असल्याचे डॉ. अजय ठक्कर यांनी या वेळी सांगितले.
सिव्हिल रुग्णालयाचा दर्जा वाढविणार
ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय; तसेच इतर ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी 1400 डॉक्टरांच्या ऑनलाईन जागा भरण्यात येणार आहेत. येत्या रविवारी (ता.13) त्यांच्या ऑनलाईन परीक्षा होणार असल्याचे आरोग्यमंत्री शेट्टी यांनी नमूद केले.