सकाळ वृत्तसेवा
१२ जून, २०१०
कोल्हापूर, भारत
पापाची तिकटी परिसरातील मुलाचा आज गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला. समर्थ प्रकाश भोसले (वय 7, रा. कुंभार गल्ली) असे त्याचे नाव आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गॅस्ट्रोने शहरात पहिला बळी आज घेतला. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
समर्थ हसूर दुमाला (ता. करवीर) येथे चार दिवसांपूर्वी नातेवाइकांकडे गेला होता. तेथे त्याला जुलाब, उलट्याचा त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारी त्याला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडत गेल्यामुळे आज सकाळी समर्थची प्राणज्योत मालवली. अत्यंत खेळकर आणि मनमिळाऊ असलेल्या समर्थच्या जाण्याने भोसले कुटुंबाला मोठा धक्का बसला. सकाळी त्याच्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत परिसरातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. समर्थचा मृतदेह पाहून रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. समर्थच्या मागे आई, वडील प्रकाश आणि लहान बहीण असा परिवार आहे.
राशिवडे, बेले, भोगावती पंचक्रोशीत पंधरा दिवसांपूर्वी गॅस्ट्रोची मोठी साथ आली होती. नदीकाठच्या ग्रामस्थांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते. शहरात महापालिकेचा आरोग्य विभाग जागा असला तरी रस्ते विकास प्रकल्प, ड्रेनेजची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळण्याची भीती व्यक्त होत आहे. काल झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती, दुधाळी, लाईन बाजार येथील नाल्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळू लागले आहे. जयंती नाला आज धबधब्याप्रमाणे नदीच्या दिशेने कोसळत होता. पंधरा दिवसांपासून कचरा उठावाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. कचरा उठावाचा ठेका असलेल्या रॅमकी कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. "पालिकेचा आरोग्य विभाग पाणी उकळून प्या, हे सांगण्यापलीकडे कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाही. पाऊस सुरू झाला असून संभाव्य साथींचे आजार रोखण्यासाठी आवश्यक ती पावले या विभागाने तातडीने उचलण्याची गरज आहे.
ही काळजी घ्या
साथीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून घ्यावे. उघड्यावरील अथवा शिळे अन्न खाऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. शकुंतला मेंगाणे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जुलाब, उलट्या, ताप अशा कोणत्याही आजाराची लक्षणे जाणवल्यास तातडीने महापालिकेच्या रुग्णालयांशी संपर्क साधावा. खासगी रुग्णालयांनी गॅस्ट्रो, कॉलरा अशा साथीचे रोगाचे रुग्ण आढळल्यास तातडीने माहिती कळवावी. तसे समजल्यास रुग्ण ज्या भागातील असतील तेथे अधिक लक्ष देणे शक्य होईल.