सकाळ वृत्तसेवा
२० मे २०१०
उरण, भारत
उरण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे जिल्हा परिषदेमार्फत साठ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येत आहे.
उरण शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उरण पूर्व विभागातील पुनारे, आवरे, पाले, पिरकोन, चिरनेर, वशेणी, गोवठणे, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे या गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. तत्कालीन सरपंच वसंत म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे 1962 मध्ये या परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोप्रोली येथे हे आरोग्य केंद्र बांधण्यात आले. उरण आणि पनवेल शहरात जाऊन खासगी व महागडे औषधोपचार न परवडणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना या केंद्रामुळे दिलासा मिळाला. या केंद्रात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
आज या आरोग्य केंद्रात एकूण तीन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचा समावेश आहे. मात्र 48 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनी झाल्याने व वाढत्या रुग्णांच्या संख्येला जागा कमी पडू लागली. अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावंड, विद्यमान सदस्या कलावती गावंड, कोप्रोली ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका सतीश म्हात्रे, माजी सभापती विश्वास म्हात्रे यांनी या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाची मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंडित पाटील यांनी आरोग्य सभापती असताना 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा फायदा या परिसरातील नागरिकांना होईल, असा विश्वास येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
कोप्रोली येथे अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र
- Details
- Hits: 3491
0