सकाळ वृत्तसेवा
०२ जुन २०१०
मुंबई, भारत
महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिव्हर ट्रान्सप्लान्ट विभागाचे नूतनीकरण आणि अतिदक्षता विभागाचे उद्घाटन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (ता.2) सकाळी साडेदहा वाजता करण्यात येणार आहे. 2003 मध्ये बांधण्यात आलेल्या या विभागाला कोट्यवधी रुपये खर्चून आधुनिक करण्यात आले आहे.
सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात लिव्हर प्रत्यारोपणाला येणारा अवाढव्य खर्च परवडू शकत नाही. अशा रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत. सार्वजनिक रुग्णालय व वैद्यकीय शिक्षण संस्थेत असलेले हे एकमेव यकृत प्रत्यारोपण केंद्र ठरणार आहे. या शस्त्रक्रियेला लागणाऱ्या गरजा लक्षात घेऊन पालिकेने शस्त्रक्रियागृह व अत्यवस्थ रुग्ण विभागाचे नूतनीकरण केले आहे.
नूतनीकरणअंतर्गत दोन अत्याधुनिक मॉड्युलर निर्माण करण्यात आल्या असून त्यात क्लास-1 लॅमिनॉर एअरफ्लो, एलइडी प्रकाशयोजना, मीडिया ब्रिज, ऍन्टिगॅसस्केव्हेजिंग सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियागृहाच्या शेजारी सहा रुग्णांना सामावून घेणारा आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण असा अत्यवस्थ रुग्ण विभाग उभारण्यात आला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना हा अत्याधुनिक लिव्हर ट्रान्सप्लान्ट विभाग फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास पालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
सेठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. जीवराज मेहता सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला महापौर श्रद्धा जाधव, उपमहापौर शैलजा गिरकर, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे व सभागृहनेते सुनील प्रभू, आरोग्य समितीच्या अध्यक्षा अश्विनी मते, विरोधी पक्षनेते राजहंस सिंह उपस्थित राहणार आहेत.
केईएममध्ये अत्याधुनिक लिव्हर ट्रान्सप्लान्ट विभाग
- Details
- Hits: 3673
0