सकाळ वृत्तसेवा
१९ मे २०१०
पुणे, भारत
ससून रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना त्याचा मुशाहिरा दिला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील लेखनिकाचीही जागा रिक्त असल्याने या विभागाचा कार्यभार ठप्प झाला आहे.
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या दारिद्य्ररेषेखालील महिलांना 650 रुपये, तर इतर महिलांना अडीचशे रुपये मिळतात. त्यासाठी सरकारी रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. ससून रुग्णालयात महिन्याला शेकडो कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात येतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना मुशाहिरा देण्यात आलेला नाही. त्यासाठी त्या महिलांना वारंवार रुग्णालयात हेलपाटे घालावे लागत आहेत.
दरम्यान, या विभागात लेखनिक नसल्याने लाभार्थी महिलांना पैसे देता आले नसल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या कामासाठी इतर विभागातील लेखनिक देण्यात आला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लेखनिक या विभागात येत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. लवकरच पूर्ण वेळ लेखनिक देण्यात येईल. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला मुशाहिरा पासून वंचित
- Details
- Hits: 3818
0