Print
Hits: 3534

सकाळ वृत्तसेवा
०६ ऑगस्ट २०१०
कोल्हापूर, भारत

एका कर्करोग झालेल्या बाईंना भेटायला त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्या आमच्यापैकी कुणाशीच बोलायला तयार नव्हत्या. पाठ करून झोपी गेल्या. आम्ही बसून राहिलो. गायत्री स्तोत्र म्हटले, श्‍लोक म्हटले, तेव्हा त्या बाई आमच्याकडे पाहून हसल्या. आम्ही त्यांचं घर आवरलं. त्या बाईंना खूप बरं वाटलं. त्या हसायला लागल्या.' कोल्हापुरातील कर्करोग मदत गटाच्या संस्थापक सदस्या अनुराधा वैद्य सांगत होत्या. 6 डिसें 2004 रोजी या मदत गटाची कोल्हापुरात स्थापना झाली. डॉ. रेखा जोशी, सोनाली देशपांडे, डॉ. हेमिनी चांदेलकर, डॉ. अनिल पेठे, निवेदिता खानविलकर हे कार्यकर्ते बनले. सुरवातीला चांगले स्वयंसेवक मिळाले. काही कर्करोग रुग्णदेखील उत्साहाने काम करीत. दर महिन्याला अनुराधा वैद्य यांच्या घरी बैठक होते. या बैठकीमध्ये रुग्णाला कर्करोगासोबत सकारात्मक जगायला शिकवले जाते. तू बरा होशील, त्यात काय एवढे मोठेसे? अशा प्रकारचे समुपदेशन न करता रुग्णाला बोलते करणे, त्याच्या मनातील भीती घालवणे, जे काही आयुष्य हातात आहे ते आनंदाने जगण्याविषयी सांगितले जाते. शाळा, महाविद्यालये, झोपडपट्ट्या येथे जाऊन कर्करोगाविषयी माहिती दिली जाते. अनुराधा वैद्य म्हणाल्या, कर्करोगाविषयी माहिती घ्यायला महिला उत्सुक नसतात. स्तनाची तपासणी घरच्या घरी करण्याविषयीची माहिती घेणेदेखील टाळतात, असा आमचा अनुभव आहे. त्यात काही तरी अशुभ आहे असा महिलांचा समज असतो.

शालिनी भट नावाच्या रुग्ण मदत गटात येत. त्यांना या गटासाठी आर्थिक मदत आवश्‍यक आहे असे वाटे. त्यांचे निधन झाल्यावर त्यांचे पती अशोक भट मूळ गावी धारवाडला गेले. शालिनीताईंनी शिकवण्या घेऊन साठवलेल्या पाच लाख रुपयांमध्ये आपले एक लाख रुपये घालून कॅन्सर सपोर्ट ग्रुपला सहा लाखांची मदत केली आहे. सौ. शालिनी कर्करोग उपचार मदत विश्‍वस्त संस्था' स्थापन केली; परंतु या संस्थेला धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रांची सर्व पूर्तता होऊनही गेली दोन वर्षे दिलेले नाही. बहात्तरवर्षीय अशोक भट धारवाडहून कोल्हापूरला खेटे घालून दमले आहेत. आपण महाराष्ट्रात पैसे कमवले तर ते इथल्या समाजाच्या उपयोगी पडावेत या भावनेतून कर्करुग्णांना मदत देणाऱ्या या माणसाला धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाकडून विश्‍वस्त संस्थेची नोंदणी देण्यास का टाळाटाळ केली जात आहे, हे एक गौडबंगालच आहे.

चर्चासत्रे, व्याख्याने, कर्करुग्णाला केमोथेरपीच्या वेळेस धीर देणे, हॉस्पिटलमध्ये रुग्णाला चहा कॉफी देणे, गरीब रुग्णांना आर्थिक मदत, सकस आहार घेण्यासाठी मदत, स्तनाचा कर्करोग झाल्यास शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम स्तन लावण्याची मानसिकता तयार करणे, असे कार्य या गटातर्फे केले जाते. तंबाखू, सिगारेट, गुटखा अशा सवयी लागू नयेत म्हणून शालेयस्तरावर व्यापक प्रमाणात प्रबोधन करण्याची मदत गटाची योजना आहे. कर्करोगाच्या रुग्णांशी मैत्र जोडणारी, त्यांच्या जीवनात आनंद भरणारी ही संस्था वाढली पाहिजे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website