सकाळ वृत्तसेवा
१३ ऑक्टोबर २०१०
पुणे, भारत
विविध पातळ्यांवर प्रचंड संशोधन सुरू असले तरी जवळच्या भविष्यात कर्करोगावर विजय मिळविणे सर्वथा अशक्यप्राय आहे, असे स्पष्ट मत नोबेल पुरस्कार विजेते, ख्यातनाम संशोधक डॉ. रॉजर च्येन यांनी मंगळवारी व्यक्त केले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) आयोजित केलेल्या "हनीवेल नोबेल लॉरिएट' व्याख्यानमालेत ते बोलत होते. पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्रातील नोबेल विजेत्यांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद व्हावा आणि त्यातून नवे शास्त्रज्ञ घडावेत, या हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यंदा त्याचे सातवे वर्ष आहे. प्रा. च्येन यांनी मंगळवारी "इंजिनिअरिंग मॉलेक्युल्स फॉर फन अँड प्रॉफिट' या विषयावर व्याख्यान दिले. उद्या (बुधवारी) ते "ब्रीडिंग मॉलेक्युल्स टू स्पाय ऑन सेल्स अँड ट्युमर्स' या विषयावर बोलणार आहेत.
कॅलिफोर्निया विद्यापीठात औषधनिर्माणशास्त्र, रसायनशास्त्र आणि जैवरसायनशास्त्राचे प्राध्यापक असणारे डॉ. च्येन यांना हरित दीप्तिमान प्रथिनाच्या (ग्रीन फ्ल्युरोसंट प्रोटिन ः जीएफपी) शोधाबद्दल 2008 मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल मिळाले होते. जनुकातून बाजूला काढलेले "जीएफसी' रेणूंच्या मदतीने पेशींच्या अंतर्गत संदेशवहन प्रक्रियेचा अभ्यास करता येणार असल्याने कर्करोगग्रस्त पेशी आणि गाठींवर उपचार करता येणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या संशोधनामुळे कर्करोगावर हमखास उपचार पद्धती विकसित होऊ शकेल, या विचारलेल्या प्रश्नावर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, ""कर्करोग हा अत्यंत गुंतागुंतीचा असाध्य आजार आहे. त्याच्याविरुद्ध प्रदीर्घ लढाई लढावी लागणार आहे. कर्करोगावर विजय मिळविण्यासाठी असंख्य प्रकारचे संशोधन सुरू आहे; पण अद्यापपर्यंत तरी फारसे यश हाती आले नाही. माझे संशोधन हा एकूण संशोधनातील एक हिस्सा आहे. नजीकच्या भविष्यातही हाती चमत्कार लागण्याची शक्यता नाही.''
संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदीर्घ काळाने नोबेल दिले जाते, हे मान्य करून ते म्हणाले, ""त्याला नाइलाज आहे. संशोधनाचे निष्कर्ष आणि परिणाम तपासून पाहण्यासाठी, त्याची उपयुक्तता यांची खातरजमा करण्यासाठी वेळ लागणारच. अर्थात, मी सुदैवी आहे; कारण मला फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही. कितीतरी विख्यात संशोधकांना नोबेलसाठी काही दशके वाट पाहावी लागलेली आहे. संशोधनाचा व्यावसायिक वापर होण्यासही बराच मोठा कालावधी लागतो. आमचे काम संशोधनाचे आहे. व्यावसायिक उत्पादनासाठी लागणारे भांडवल आणि यंत्रणा आमच्याकडे नाही. तसे कौशल्यही नाही.''
तत्पूर्वी व्याख्यानात बोलताना प्रा. च्येन यांनी रसायन, भौतिक, अभियांत्रिकी, डिझायनिंग यांच्या जीवशास्त्राबरोबरील समन्वयावर भर दिला. ""पुढील पन्नास वर्षांत कर्बवायूंचे प्रमाण कमी करणे, शाश्वत ऊर्जास्रोत विकसित करणे, सूर्यप्रकाशापासून जैवइंधन तयार करणे ही प्रमुख आव्हाने असतील. भविष्यातील संगणक हे जैवरेणूंच्या आधारे तयार केलेले स्वयंनियोजित (सेल्फ कंट्रोल्ड) असतील,'' असे सांगून त्यांनी पुढील काळात आरोग्य सेवेच्या केंद्रस्थानी जैववैद्यकीय अभियांत्रिकी राहील, असे मत व्यक्त केले.
या वेळी "हनीवेल' या विविध तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रातील कंपनीचे भारत आणि चीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेन टेडजार्ती, भारताचे प्रमुख डॉ. अनिल गुप्ता आणि "सीओईपी'चे संचालक प्रा. अनिल सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.