Print
Hits: 2370

सकाळ वृत्तसेवा
१० डिसेंबर २०१०
पुणे, भारत

'कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होणे गरजेचे आहे. कर्करोगावर अमेरिकेत होणाऱ्या संशोधनासाठी सरकार दर वर्षी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करते. या रोगाविषयी व विविध उपचार पद्धतींविषयी माहिती देण्याबरोबरच रुग्ण व नातेवाइकांचे समुपदेशन करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र क्रांतिकारक कार्य करू शकेल,'' असा विश्‍वास अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या सेंटर फॉर बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्‍स ऍण्ड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी विभागाचे उपसंचालक जॉर्ज कॉमत्सुलेस यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

कर्करोग व आयटीविषयक आयोजित परिषदेनिमित्त पुण्यात आले असताना त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. कर्करोगाचे मूळ कारण शोधून काढावे आणि या रोगाचे समूळ उच्चाटन करावे यासाठी अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनआयसी) कार्यरत आहे, असे कॉमत्सुलेस यांनी सांगितले. ते म्हणाले, 'एनआयसी ही मुख्यतः कर्करोगविषयक संशोधन करण्याबरोबरच जगभर चाललेल्या संशोधनासही पाठिंबा देते. कर्करोग नष्ट करण्यासाठी रोग झाल्यावर उपचार करण्याबरोबरच पेशींतील मूळ घटक समजून घेऊन संशोधन करणे गरजेचे आहे. एनआयसी माहिती व तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहे. यासाठी संस्थेने 2004 मध्ये एक प्रणाली विकसित केली. त्याद्वारे आम्ही कर्करोगावर संशोधन करणाऱ्यांची संगणक "कम्युनिटी' तयार केली आहे. संशोधक अनुभव, माहिती या कम्युनिटीद्वारे मांडू शकतात. संशोधकांमधील परस्पर संवादामुळे संशोधनास अधिक गती मिळते. या विषयात काय संशोधन चालू आहे, हे नागरिकांनाही कळू शकते. त्याचबरोबर रुग्णांना कर्करोगाविषयी सर्व माहिती दिली जाते.''

कर्करोग झाल्याचे स्वीकारणे कोणत्याही रुग्णास अवघड असते. त्याचबरोबर नातेवाइकांनाही हा धक्का सहन होत नाही. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात समुपदेशनला महत्त्व दिले जाते, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""सरकारतर्फेही असे समुपदेशन करणारे लोक आहेत. त्याचबरोबर सामाजिक संस्थाही त्यासाठी मोठे कार्य करतात. या रोगाविषयी शिक्षणाद्वारे जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. रोगाचे निदान झाल्यावर मानसिक धक्का बसतो. त्यातून सावरण्यासाठी रुग्ण व नातेवाईक यांना समाज, रुग्णालये व संशोधन संस्थांनी मानसिक पाठिंबा देणे गरजेचे असते. यासाठी अमेरिकेत वेबसाईटचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे. त्याचबरोबर टोलफ्री नंबरही आहे. त्यावर या रोगाविषयी सर्व माहिती, रुग्णास योग्य ती मानसिक मदत दिली जाते.''

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.