सकाळ वृत्तसेवा
०९ डिसेंबर २०१०
पुणे, भारत
'कर्करोगावर मूलभूत संशोधन, विचारमंथन करण्यासाठी जगभरातल्या अभ्यासकांना संगणकाद्वारे एकत्र व्यासपीठ देण्याची सुविधा सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगने (सी-डॅक) केली आहे. त्यासाठी सी-डॅकने ही यंत्रणा अमेरिकेतील जॉर्ज टाऊन विद्यापीठाशी जोडली असून, आगामी काळात या यंत्रणेद्वारे मोठे संशोधन होण्याची आशा आहे,'' अशी माहिती सी-डॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. दरबारी म्हणाले, 'कॅन्सर बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक ग्रीड या प्रणालीमुळे कर्करोगावर जगभर चाललेले संशोधन, रुग्णांचा अभ्यास एकत्र उपलब्ध होऊ शकेल. याविषयी कार्यरत असलेल्या विविध संघटना, संघ यांना एकत्र आणता येईल. एकत्रितपणे काम करून या आजारावर अंतिम उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. या प्रणालीद्वारे हिंदी, स्पॅनिश, अरेबिक, पोर्तुगीज भाषांमध्ये भाषांतर होऊन जगातील अधिकाधिक लोकांना माहितीचा उपयोग करता येईल. कर्करोगाचे निराकरण करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी पर्यायी औषधांनाही या प्रणालीद्वारे एकत्र आणले जाईल. ही संगणक प्रणाली अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने प्रायोजित केली आहे, तर यावरील कार्यक्रमावर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सेंटर फॉर बायोइन्फॉर्मेटिक्स देखरेख ठेवते. याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी उद्या व परवा आंतरराष्ट्रीय परिषद आयोजिण्यात आली आहे. त्यात अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, शिकागो विद्यापीठ, इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन येथील प्रतिनिधींबरोबरच चेन्नईतील कॅन्सर इन्स्टिट्यूट, दिल्ली येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व आयोमंत्रा यांचे प्रतिनिधी सहभागी होतील.''
कर्करोगाचे अभ्यासक संगणकाने जोडणार!
- Details
- Hits: 3426
0