सकाळ वृत्तसेवा
०२ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत
'आपण रुग्णालयात उभे आहोत की वर्षानुवर्षे सफाई न झालेल्या एखाद्या सार्वजनिक स्वच्छतागृहात, हेच येथील दुर्गंधीमुळे कळत नाही. अशाने रुग्णांचे आरोग्य सुधारेल कसे..?'' ही त्रस्त प्रतिक्रिया आहे एका तरुण रुग्णाची. कमालीची अस्वच्छता व दुर्गंधी, स्वच्छतागृहांची दुरवस्था, संथ कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांसह त्यांचे नातेवाईकही त्रस्त झाले आहेत. इथल्या कारभाराविषयी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
शहराच्या मध्यवर्ती भागातील रुग्णालय असल्याने रुग्णांची या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. मात्र, येथील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाला सामोरे जावे लागत असल्याचे अनेक नागरिकांनी आवर्जून सांगितले. येथील बाह्य रुग्ण विभागात केसपेपर काढताना रुग्णांना पाच रुपये भरावे लागतात व औषधे घेताना पाच रुपये पुन्हा भरावे लागतात. इतर रुग्णालयांमध्ये एकदम दहा रुपये भरून रुग्णांना केसपेपर काढता येतो, इथल्या या प्रकाराबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तपासणी झाल्यावर औषधे घेण्यासाठी तीन खिडक्यांवर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यातील एकच खिडकी उघडी असल्याने रुग्णांची तेथे गर्दी होते.
रुग्णालयातील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. औषधांसाठी रांग लावणाऱ्या रुग्णांना तेथील दुर्गंधीला सामोरे जातच या ठिकाणी उभे राहावे लागते. गर्दीच्या वेळी तर ही रांग स्वच्छतागृहापर्यंत जाते. स्वच्छतागृहातील सांडपाणीही अनेकदा वाहून बाहेर येते. याबाबत रुग्णालयाच्या प्रशासनाने कोणतीही पावले उचलण्याची तसदी घेतलेली नाही. येथील 11 नंबरलाही बिल भरण्यासाठी रुग्णांची गर्दी होत असते. तेथेही पाच काऊंटरवर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तेथील दोन ठिकाणीच कर्मचारी उपलब्ध असल्याने रुग्णांची अडचण होते. विशेषतः गर्दीच्या वेळी येथे एकच गोंधळ उडतो. वीज गेल्यावरही नागरिकांना येथे ताटकळावे लागते. अशा वेळी येथील कर्मचारी रुग्णांना हॅंडबिल देत नसल्याने रुग्णांची अडचण होते. या प्रकारांबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली.
ना दाद, ना फिर्याद
कमला नेहरू रुग्णालयासारख्या पालिकेच्या मोठ्या रुग्णालयात नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते आहे. मात्र, येथील अव्यवस्था आणि भोंगळ कारभाराबाबत सर्वसामान्यांनी कोणाकडे तक्रार करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महापालिका प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याने रुग्णालयाचे कर्मचारीही हतबल झाले आहेत. या प्रकाराची दखल घेऊन कामकाजामध्ये त्वरित योग्य त्या सुधारणा व्हाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.