सकाळ वृत्तसेवा
१५ जुन २०१०
कन्नड, भारत
गेल्या दहा दिवसांपासून शहरात गॅस्ट्रो आणि कॉलऱ्याची साथ सुरू आहे. रविवारी (ता. 13) आणि मंगळवारी (ता. 14) 25 रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एम. मुरुंबीकर, डॉ. प्रवीण पवार यांनी सांगितले, की दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रो आणि कॉलऱ्याची साथ पसरली आहे. औरंगाबाद विभागाचे सहायक आरोग्य उपसंचालक डॉ. रवींद्र गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील श्रीमती डॉ. माधुरी थोरात यांनी सोमवारी (ता. 14) स्वतः ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची तपासणी केली. साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी या भागात त्वरित टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून सूचना केली आहे. ता. 13, 14 या दरम्यान अंजुमबानो इब्राहीम शेखक (वय 40), महेबूब नासीर खान (वय 60), कमरूद्दीन रफीक शेख (वय 23), वजिर वसीम शहा (वय 70), अब्दुल मजीद शेख महंमद (वय 80), सहेमुद्दीन शहा, अब्दुल जफार (वय 16), बतूल फतिमा शेख, अब्दुल नवीद शेख शकील (वय 19), नसिम शेख निसार (वय 35), नर्गिस मजिद खान (वय 15, काझी मोहल्ला), अलियान हैदर खान (वय 4) सादिया अहमद शेख (वय 3), अब्दुल्ला रहीम खान (वय 4), अरबाज खान, रशीद खान (वय 8), हिना कैसर मोहंमद युनूस (वय 20), मुस्तफीन शफियोद्दीन शेख (वय 24), अमिना मोहंमद खान (वय 35), नईम अमीर शेख (वय 52) आदी रुग्ण दाखल झाले.
नगरपालिकेने त्वरित स्वच्छता मोहीम सुरू करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. गजानन सुरासे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष जब्बार खान, अनिल शेळके, समाजवादी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रफीक शेख, मुजीब खान, फेरोज खान, हारुण शेख, वाहेद शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की शहरात सर्वत्र नाल्या तुंबल्या आहेत. वॉल्व्हद्वारे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते. तुंबलेल्या नाल्यातून पाणीपुरवठा करणारे पाईप जातात. ते ठिकठिकाणी फुटले आहेत.
मुख्याधिकारी कारभारी दिवेकर म्हणाले, की जलशुद्धीकरण केंद्रावरून शुद्धीकरणाची पद्धतच चुकीची आहे. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर किमान एक तास पाणी स्थिर राहणे आवश्यक असते; मात्र या प्रक्रियेस फाटा देण्यात आला होता. त्यामुळे सुपर क्लोरिनेशन होत नव्हते. त्या पद्धतीत आता बदल करण्यात येत आहे. लिकेज पाईप काढण्यावर भर देण्यात येईल. टॅंकरने पाणीपुरवठा करणे परवडणारे नाही. विजेचे भारनियमन अमर्याद सुरू आहे. त्यामुळे पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लवकरच स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल.
ग्रामीण रुग्णालयात खाटेअभावी रुग्णांचे हाल
ग्रामीण रुग्णालयात चाळीस खाटांची सोय आहे. सध्या तेवीस महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तीन महिलांची प्रसूती झाली आहे. कारभारी कचरू शिंदे (रा. हतनूर), समीर वसीन खान (वय 24, रा. कुंजखेडा), नितीन कडुबा फलके (वय 13, रा. शिवराई), छाया, मुरलीधर पवार (रा. बनशेंद्रा), रफीक रशिद शेख हे गॅस्ट्रोचे रुग्णही नव्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयाच्या व्हरांड्यात टाकण्यात आले आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.