Print
Hits: 3513

सकाळ वृत्तसेवा
१८ जुन २०१०
प्रदीप कुलकर्णी

जत - ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सी. बी. पवार यांच्या मनमानी कारभाराला येथील कर्मचारीही वैतागले आहेत. त्यांच्यामुळेच कर्मचाऱ्यांत पडलेल्या दोन गटांचा फायदा अधीक्षकांना मिळत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाला रुग्णांना सामोरे जावे लागते. रुग्णांच्या नातेवाइकांना "बाहेरून औषधे विकत आणण्याची क्षमता असेल तरच दाखल करा' असा सल्ला येथील "तज्ज्ञ' मंडळी नातेवाइकांना देत आहेत.

नेहमीच दर्जावरून चर्चेत आलेल्या जत व माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. गोरगरिबांचा दवाखाना म्हणून येथे कर्नाटक सीमेवरील व तालुक्‍यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत होते. परंतु डॉ. सी. बी. पवार यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. येथील रुग्णांना आपल्या खासगी दवाखान्याकडे वळविण्यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली. त्यामुळे स्वतःच्या रुग्णालयात रुग्णांची दिवसभर गर्दी तर ग्रामीण दवाखाना ओस पडू लागला. त्यांच्या मनमानीमुळे कारवाईच्या भीतीने कर्मचारीही गप्प आहेत.

रुग्णालयाला वैद्यकीय तज्ज्ञ, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबरोबरच औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाइकांना येथे औषधे नाहीत. त्याचा तुटवडा आहे. बाहेरून औषधे आणण्याची आर्थिक क्षमता असेल तरच तुम्हाला उपचारासाठी दाखल करून घेतो, असा सल्ला दिला जातो. रेबिज लसीचा जाणीवपूर्वक तुटवडा भासविला जातो. यावरून रुग्णांचे नातेवाईक व अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांत बऱ्याचदा वैद्यकीय तज्ज्ञांशी वाद झाला आहे. औषधे बाहेरून आणून दिल्यानंतर ही कितपत वापरली जातात हा संशोधनाचा विषय आहे.

अधिक चौकशी केल्यास "संशय असेल तर रुग्णाला घेऊन चालते व्हा' अशी उद्धट उत्तरे दिली जातात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयासाठी मोफत येणारे इंजेक्‍शन, औषधे व रेबिज लस जातात कुठे, असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

रस्त्यातच प्रसूती
येथील शिवाजीपेठ परिसरातील महिलेला चार दिवसांपूर्वी मिळालेली ट्रीटमेंट अतिशय बोलकी आहे. या महिलेला रात्रीच्यावेळी बाळंतपणासाठी रुग्णालयात नेण्यात आले. येथील कर्मचाऱ्यांनी "वैद्यकीय तज्ज्ञ नाहीत. सोय नाही' असे सांगून बाहेर हाकलले. त्यांना खासगी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच डिलीव्हरी झाली. या महिलेच्या जीवावर बेतले असते तर जबाबदार कोण, असा प्रश्‍न नातेवाईक करीत आहेत. यावरूनच ग्रामीण रुग्णालयाचा कारभार दिसून येतो.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.