सकाळ वृत्तसेवा
०८ मे, २०१०
शहादा, भारत
ऍपेंडिक्सची शस्त्रक्रिया करताना औषधाचा अधिक प्रमाणात डोस दिल्याने मुलीचा मृत्यू झाला. म्हसावद (ता. शहादा) येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (ता. 6) ही घटना घडली. याबाबत तीन डॉक्टरांविरुद्ध म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात वैशाली भरत चकोर (वय 16) हिला औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (ता. 6) सकाळी साडेनऊला ऍपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली. आयुर्वेदातील शल्यचिकित्सक डॉ. अमोल वैद्य यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांना ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अशोक पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. अशोक गोसावी यांनी मदत केली. शस्त्रक्रियेनंतर ही मुलगी शुद्धीवर आली नाही. ती मरण पावल्याचे निदर्शनास आले. शस्त्रक्रियेदरम्यान संबंधित डॉक्टरांनी योग्य काळजी न घेतल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विजय पाटील यांनी गुरुवारी दुपारी म्हसावद पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर मुलीची आई शालूबाई भरत चकोर यांनी म्हसावद पोलिस ठाण्यात मुलीच्या मृत्यूसंदर्भात डॉ. गोसावी, डॉ. पाटील, डॉ. वैद्य यांना जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदविली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक आर. के. साळवे तपास करीत आहेत.
दरम्यान, शवविच्छेदनाची तयारी करण्यात आली. त्यासाठी रुग्णालयात शव आणण्यात आला. सर्जन, महिला स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिष्ठाता यांची उपस्थिती आवश्यक असल्याने, शवविच्छेदन नंदुरबार जिल्हा रुग्णालयात करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, नंदुरबार जिल्हा रुग्णालय व म्हसावद ग्रामीण रुग्णालयाचे हितसंबंध असू शकतात, ही बाब लक्षात घेऊन धुळे येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची मागणी नातेवाइकांनी केली. त्यानुसार आज सकाळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांच्या उपस्थितीत सात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाइकांनी मृतदेह म्हसावद पोलिस ठाण्यात आणला. संशयित तिन्ही डॉक्टरांना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी म्हसावदला तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी पी. डी. सरदार, सहाय्यक निरीक्षक सुनील बच्छाव यांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कारवाई करण्यात येत नसल्याचे सांगत नातेवाइकांची समजूत घातली. दुपारी चारला वैशालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती शहादा पालिकेचे नगरसेवक लक्ष्मण बढे यांची भाची होय.
सायंकाळी पाचला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. त्र्यंबक खोत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एल. जैन यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पी. डी. सरदार यांची भेट घेतली. घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर श्री. खोत यांनी सांगितले, की घटनेची पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणारे अहवाल उद्या (ता. 8) सायंकाळपर्यंत मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रातील नियमाप्रमाणे डॉ. गोसावींविरुद्ध खात्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. वैशालीला योग्य न्याय दिला जाईल. रासायनिक व व्हिसेरा चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे योग्य कारण कळेल.
शस्त्रक्रियेसाठी चार हजार घेतल्याची तक्रार
डॉ. वैद्य हे आयुर्वेदातील शल्यचिकित्सक पदवी प्राप्त आहेत. त्यांचे शहादा शहरात रुग्णालय आहे. त्यांच्याकडे असलेल्या पदवीनुसार त्यांना बाह्यशस्त्रक्रिया करण्याचा अधिकार आहे. अंतर्गत शस्त्रक्रिया त्यांच्या अधिकारात येत नाही. तरी त्यांनी म्हसावद येथे वैशालीच्या ऍपेंडिक्सची शस्त्रक्रिया केली. याबाबत वैद्यकीय वर्तुळात चर्चा आहे. डॉ. अशोक गोसावी यांनी बाहेरच्या डॉक्टरला पूर्वपरवानगीशिवाय बोलाविल्याचे जिल्हा शल्यचिकित्सांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी चार हजार रुपये घेण्यात आल्याचा आरोप वैशालीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारअर्जात केला आहे.
औषधाचा अधिक डोस दिल्याने मुलीचा मृत्यू
- Details
- Hits: 3669
0