Print
Hits: 2885

सकाळ वृत्तसेवा
०३ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत

'औंध येथील जिल्हा रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यात येणार असून, अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी हे रुग्णालय सुसज्ज करण्यात येईल,'' अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सोमवारी येथे दिली.

शेट्टी यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप या प्रसंगी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, 'औंध रुग्णालयाचा विस्तार करण्याचा प्रकल्प राज्याच्या आरोग्य खात्याने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत तीनशे खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येईल. या रुग्णालय उभारणीसाठी किती खर्च येईल, याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मागविण्यात आला आहे. पुढील एक महिन्यांमध्ये खर्चाचा अंदाज येणे अपेक्षित आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये पुण्यात सध्या सातशे ते आठशे खाटांचा तुटवडा आहे. त्यासाठी सध्याचे रुग्णालय "ईएसआय'च्या जागी हलविण्यात येणार आहे. तेथे "व्हेंटिलेटर', "डायलिसिस' अशा प्रकारची सर्व अद्ययावत उपकरणे खरेदी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.''

सध्या असलेल्या जिल्हा रुग्णालयातील एक मजला म्हणजे सुमारे शंभर खाटा संसर्ग रोगांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत; तसेच क्षयरोगाच्या रुग्णांसाठी या इमारतीत स्वतंत्र्य व्यवस्था आहे. आरोग्य खाते राज्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. त्याचे मुख्य केंद्र पुण्यात असेल. त्यासाठी या इमारतीमधील एक मजला असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.