सकाळ वृत्तसेवा
३० ऑगस्ट २०१०
मुंबई, भारत
"ओपन हार्ट सर्जरी'ला होली फॅमिली रुग्णालयाने प्रगत तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध केला आहे. या रुग्णालयात आजपासून मुंबईतील पहिली हायब्रिड कॅथ लॅब सुरू झाली आहे. वैद्यकक्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन झाले.
प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेतल्यास अनेक रुग्णांना ओपन हार्ट शस्त्रक्रियेची गरज राहणार नाही. अत्यल्प काळामध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियेत केवळ छातीच्या डाव्या बाजूला सूक्ष्म छिद्र घेऊन ग्राफिक्स पद्धतीने हृदयातील रक्तवाहिन्यांमधील गुठळ्यांचा मार्ग मोकळा करता येणार आहे. तसेच त्याचवेळी या लॅबमध्ये रुग्णांच्या हृदयाचा प्रतिसादही तपासून पाहता येईल. ही लॅब अत्यंत आधुनिक आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशी आहे. या लॅबमुळे पन्नास टक्के रुग्णांना हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कॅथेटरआधारित तंत्राच्या मदतीने करणे शक्य होणार आहे. तसेच येथे ऍनियुरीझम, व्हॉव्ल्स बदलणे, क्लोजर डिव्हाईस बदलणे, स्टेनिंग सारख्या गुंतागुंतीच्या तक्रारीही सहज सोडवता येणार आहेत. हृदयाची कोणतीही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते, त्यातील मार्गिकाही खूप छोट्या असतात, अशावेळी ओपन हार्ट शस्त्रक्रिया केल्यास त्यातही काही वेळा रुग्णांना शारीरिक त्रास होतो, तो त्रास आणि रुग्णांवर पडणारा खर्चाचा बोजाही कमी होईल, असा विश्वास होली फॅमिली रुग्णालयाच्या डॉ. ब्रायन पिंटो यांनी यावेळी व्यक्त केला. नवीन सुविधा केंद्राला सचिनने यावेळी शुभेच्छा दिल्या. डॉक्टरांचे काम अथक परिश्रमाचे असल्याचा आवर्जून उल्लेख करीत सचिनने यापुढील काळात येथील संशोधनाच्या भरीव कार्याचा लाभ अनेकांना होईल, अशी आशाही व्यक्त केली.
ओपन हार्ट सर्जरी'ला प्रगत तंत्रज्ञानाचा पर्याय
- Details
- Hits: 3204
0