सकाळ
२९ जुलै २०१०
पुणे, भारत
एचआयव्ही बाधितांना भेदभावाचा सामना करून सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने ’वेक अप पुणे’ च्या वतीने पुण्यात ’एचआयव्ही पॉसिटिव्ह’ व्यक्तींसाठी वधू-वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
’वेक अप पुणे’ सह दिपगृह सोसायटी, आरोग्य डॉट कॉम, पुणे जिल्हा आगरवाल युवा संमेलन, पॉसिटीव्ह साथी आणि सेंटर फॉर अॅडव्होकसी अॅंड रिसर्च यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती या संघटनांच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. येत्या एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळात रविवार पेठेतील अग्रसेन भवनामध्ये हा मेळावा आयोजिण्यात आला आहे. ’या मेळाव्यामुळे आपल्यासारख्याच व्यक्तींना भेटून परस्परांच्या सोबतीने देखभाल आणि आधर देणारे एक कायमस्वरूपी नाते जोडण्याची संधी मिळेल,’ असे दिशा केंद्राचे अविनाश चक्रनारायण म्हणाले.
’एचायव्हीबाधित व्यक्ती योग्य औषधोपचारांच्या मदतीने काही दशके जगू शकते. एचायव्ही म्हणजे शेवट नव्हे; त्यामुळे त्यानंतरचे आयुष्य जगणे याद्वारे शक्य होईल,’ असे रायन यांनी नमूद केले. या वेळी द्विजेन स्मार्त, संयोगिता ढमढेरे आदी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी शंभर जणांनी नोंदणी केली असून, ’आरोग्य डॉट कॉम’ या वेबसाईटवर नोंदणी करता येईल, एचआयव्ही पॉसिटिव्ह असलेले आणि यापूर्वीच्या मेळाव्यात भेट होऊन विवाहबध्द झालेले सुनील आणि निलम गायकवाड यांनीही एकमेकांच्या साथीने सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगत असल्याचे सांगितले.