सकाळ वृत्तसेवा
२४ मे २०१०
मुंबई, भारत
गरमागरम तळलेले भजी वडे, पाणीपुरी, शेवपुरी खाण्याची हुक्की अनेकदा येते, पण रस्त्यावरचे हे पदार्थ आरोग्यास अत्यंत धोकादायक असतात. त्यातून अनेक आजारांना आपण आमंत्रण देतो, असे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या सर्वेक्षणामधून रस्त्यावरचे 88 टक्के अन्न हे असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.
डिसेंबर 2009 ते फेब्रुवारी 2010 या कालावधीमध्ये रस्त्यावरील अन्नपदार्थांच्या 70 नमुन्यांची तपासणी केली. या तपासणीतून पुढे आलेल्या निष्कर्षातून उघड्यावरचे अन्न असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॅडल रोड, शिवाजी पार्क, रुईया कॉलेज, पोदार कॉलेज, मांटुगा, हाजी अली आणि आजूबाजूच्या परिसरातून हे नमुने गोळा करण्यात आले होते.
मेट्रोपॉलिसमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या गटाने फूड पॅथोजेने स्क्रिनिंगचा वापर करून रस्त्यावरील अन्नपदार्थांची "क्वान्टिटेटिव्ह बॅक्टेरिअल ऍनालिसिस टेस्ट' केली होती. ही तपासणी ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली असून त्यातील 40 नमुन्यांमध्ये फेकल स्ट्रप्टोकोकी आणि एण्ट्रोकोकी विषाणू सापडले. काही नमुन्यांत मलाचे मिश्रण आढळले, तर 37 नमुन्यांमध्ये यीस्ट आणि बुरशी सापडली. मेट्रोपॉलिसमधील जैवशास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. शामा शेट्ये यांनी याबाबत चिंता व्यक्त करून अन्नाच्या बाबतीमध्ये स्वच्छतेच्या बाबी तपासण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा अद्याप उपलब्ध नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. अयोग्य पद्धतीने केलेल्या अन्नाच्या साठ्यामुळेही हे अन्न आरोग्यास अपायकारक ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.