Print
Hits: 6019

सकाळ वृत्तसेवा
०१ जुलै २०१०
सातारा, भारत

"आरोग्यं धनसंपदा' असे आपण म्हणतो. डॉक्‍टर आणि रुग्ण यांचे नाते विश्‍वासाचे असते. काही रुग्णांना त्यांचा स्पर्शही परिसाप्रमाणे भासतो. आज (एक जुलै) "डॉक्‍टर्स डे' आहे, त्यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी "प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्‍युअर'चा मंत्र नागरिकांना दिला आहे. रोग होण्याऐवजी तो होऊच नये, यासाठी त्यांनी दिलाय लाखमोलाचा सल्ला केवळ तुमच्यासाठी...

सतत डॉक्‍टर बदलू नका
डॉ. जवाहरलाल शहा (होमिओपॅथिक) - रुग्णांनी वरचेवर डॉक्‍टर बदलत राहू नये. यामुळे कोणत्याही डॉक्‍टरांना संपूर्ण प्रकृतीची माहिती किंवा निदान करता येत नाही. रुग्णाचा व त्याच्या कुटुंबीयांचा डॉक्‍टरांवर पूर्ण विश्‍वास पाहिजे. रुग्णांनी डॉक्‍टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळीस घेतल्यास प्रकृतीची अडचण जाणवणार नाही. डॉक्‍टरांच्या सल्ला घेऊनच औषधे घ्यावीत.

डॉक्‍टरांना देव मानू नये
डॉ. प्रतापराव गोळे (एमडी मेडिसीन) - गेल्या वर्षभरात राज्यात डॉक्‍टरांवर आणि त्यांच्या रुगणालयांवर हल्ले झाले. त्यामुळे अनेकांना कायद्याचा आधार घ्यावा लागला. या गोष्टी घडण्याचे कारण म्हणजे रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉक्‍टरांना देव मानत आहेत. ही गोष्ट चिंताजनक झाली आहे. समाजाने डॉक्‍टरांना देव म्हणून बघण्याचे सोडून दिले पाहिजे. डॉक्‍टरांनी रुग्णांना विश्‍वासात घेऊन त्यांना आपली मर्यादा स्पष्ट करावी. त्यामुळे रुग्ण व डॉक्‍टर यांच्यात संभ्रम निर्माण होणार नाही.

बाळाची तपासणी हवी
डॉ. संजय राऊत (बाल शल्यचिकित्सक) - बाळ जन्मल्यानंतर त्यास अनेक प्रकारचे व्यंग असू शकतात. बाळाच्या आजारांवर योग्य वेळी उपचार होणे आवश्‍यक असते. प्रत्येक पालकाने आपल्या बाळाचे बाहेर दिसणारे सर्व अवयव तपासणे गरजेचे असते. पालकांनी नवजात बालकांची तपासणी योग्य वेळी तज्ज्ञांकडून करून घेणे आवश्‍यक आहे.

मद्यपान करून वाहन चालवू नका
डॉ. सुधाकर लावंड (अस्थिरोग तज्ज्ञ) - पावसाळ्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असते. नागरिकांनी कोणत्याही महामार्गावरून प्रवास करताना त्यांच्या वाहनाची वेगमर्यादा कमी ठेवली पाहिजे. शिस्तबद्ध पद्धतीने वाहन चालविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. विशेषत- मद्यपान करून वाहन चालविणे टाळले पाहिजे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

नियमित चालणे गरजेचे
डॉ. शीतल रा. गोसावी (हृदयरोग तज्ज्ञ) - हृदयरोग टाळण्यासाठी निर्व्यसनी राहावे. नियमित 30 मिनिटे जलद किंवा एक तास पाच किलोमीटर चालावे. जेवणात तेलकट, तुपट, गोड, तसेच मांसाहार अत्यल्प ठेवावा. वृद्धांनी दररोज जागेवर का होईना किमान तीन मिनिटे जॉगिंग करावे. तीन पुलप्स मारावेत. वजन आटोक्‍यात ठेवावे. उंची सेंटीमीटर वजा 100 असे वजन ठेवावे. वजन आटोक्‍यात येत नसेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. नियमित तपासणी ठेवावी.

ज्येष्ठांनी काठीचा आधार घ्यावा
डॉ. संजय क्षीरसागर (अस्थिरोग तज्ज्ञ) - सध्या यांत्रिकी युगामध्ये घर, रस्ता, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांत वाढ होत आहे. हे टाळण्यासाठी रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे पालन, गरजेपुरता वाहनांचा वापर महत्त्वाचा आहे. ज्येष्ठांनी घरात व सभोवताली वावरताना काठीचा आधार घ्यावा. जेणेकरून पडून होणारी मोडतोड टाळता येईल.

सकारात्मक विचारांची गरज
डॉ. रमेश पाटील (हृदयरोगतज्ज्ञ) - नागरिकांनी आहार, विहार व विचार या त्रिसूत्रीचा योग्य पद्धतीने अवलंब केला, तर त्याला कोणत्याही प्रकारच्या व्याधी होणार नाहीत. प्रत्येक ऋतूमध्ये चौरस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टी आता आवश्‍यक झाल्या आहेत. सध्याच्या ताण- तणावाच्या जीवनात सकारात्मक विचारांची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे.

तेलकट पदार्थ टाळावेत
डॉ. अविनाश गरगटे (हृदयरोग तज्ज्ञ) - हृदयरोग व मधुमेह टाळण्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे. वजन नियंत्रित ठेवल्यास हृदयरोग व मधुमेहाचा त्रास जाणवणार नाही. त्यासाठी व्यसनापासून दूर राहण्याची गरज आहे. जेवणातही मिठाचे प्रमाण कमी, तसेच तेलकट पदार्थ टाळणे गरजेचे आहे. शक्‍यतो शाकाहारी जेवण घ्यावे.

लसीकरण वेळेवर हवे
डॉ. चंद्रशेखर औंधकर (बालरोग तज्ज्ञ) - लहान बालकाला वेळच्यावेळी लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते निरोगी राहण्यासाठी मातेच्या स्तनपानाची गरज आहे. सहा महिन्यानंतर योग्य व संतुलित आहारही गरजेचा आहे. या सर्वांबरोबर आई-वडिलांचे प्रेम मिळाल्यास त्याला भावनिक आधार मिळतो. त्यामुळे त्याचे संगोपनही योग्य रीतीने होण्यास मदत होते.

समतोल आहार हवा
डॉ. ज्ञानेश शिर्के (नेत्ररोग तज्ज्ञ) - डोळे निरोगी राहण्यासाठी समतोल आहाराची गरज आहे. त्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या व कडधान्यांचा वापर करावा. घरातून बाहेर पडताना व वाहन चालविताना गॉगल अथवा चष्म्याचा वापर करावा. लहान मुलांना टोकदार वस्तू खेळण्यास देऊ नयेत. 40 वर्षांवरील नागरिकांनी आवश्‍यक तपासण्या करून घ्याव्यात.

नियमित तपासणी करा
डॉ. आर. जी. रानडे (कर्करोगतज्ज्ञ) - कोणताही शारीरिक त्रास नसतानाही प्रत्येकाने नियमितपणे वर्षाला एकदा तरी शारीरिक तपासणी करावी. महिलांमध्ये स्तन, गर्भाशय तसेच तोंडाच्या कर्करोगाचे आजाराचे निदान त्यामुळे तातडीने होऊ शकते. औषधोपचार वेळेवर झाल्यास तो पूर्ण बराही होऊ शकतो. कर्करोग हा बरा न होणारा आजार असा समज आहे. मात्र, तो चुकीचा आहे. निदान लवकर झाल्यास तो तातडीने बरा होऊ शकतो.

कानात तेल, पाणी घालू नका
डॉ. राजेश करंबेळकर (नाक, कान, घसा तज्ज्ञ) - कानात तेल, पाणी अथवा टोकदार वस्तू घालू नयेत. पावसाळा व थंडीत थंड पदार्थ वर्ज्य करावेत. पाणी उकळून प्यावे. लहान मुलांना शेंगदाणे व फुटाणे अखंड देऊ नयेत. नाक जोरात शिंकरणे व टोकरणे टाळावे. गुटखा, तंबाखू, मिशरी आदींचा वापर करू नये.

गुटखा, तंबाखूपासून दूर राहा
डॉ. परेश पाटील (अस्थिरोग तज्ज्ञ) - शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यानंतर हाडे ठिसूळ बनतात. त्यामुळे त्याचा त्रास जाणवू लागतो. त्यासाठी पुरुषांनी व्यसनमुक्त राहण्याची गरज आहे. अल्कोहोल, तंबाखू, गुटखा आदींपासून दूर राहावे. महिलांनी मिशरी, तपकीर यांचा वापर करू नये. व्यसनमुक्तीबरोबर संतुलित आहारही गरजेचा आहे.

महिलांनी चाळीशीनंतर तपासणी करावी
डॉ. मोहन बोधे (स्त्रीरोग तज्ज्ञ) - महिलांनी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात सुरवातीपासूनच योग्य तपासण्या करण्याची गरज आहे. त्यामुळे बाळाची वाढ, मातेचा रक्तदाब आदींबाबत माहिती मिळू शकते. त्यादृष्टीने बाळाच्या वाढीसाठी काळजी घेता येते. पाचव्या महिन्यांत सोनोग्राफी केल्यास बाळाची वाढ योग्य होते, की नाही ते समजणे सोपे जाते. वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी योग्य त्या तपासण्या करणे गरजेचे आहे.

मुलांना चॉकलेट देऊ नका डॉ. विशाल पावसकर (दंत चिकित्सक) - लहान मुलांना बिस्किटे व चॉकलेट खाण्यास देऊ नयेत. लहानपणापासून दिवसांतून दोन वेळा दात घासण्याची सवय लावणे गरजेचे आहे. बारा वर्षांनंतर क्‍लोराईड युक्त पेस्ट वापरावी. तंबाखू, मिशरी आदींना दात घासू नयेत. प्रत्येक सहा महिन्यांनंतर डॉक्‍टरांना दात दाखविणे गरजेचे आहे. वेळोवेळी हिरड्यांची स्वच्छता गरजेची आहे.

पाणी उकळून प्यावे
डॉ. विजय कणसे (पोटविकार तज्ज्ञ) - पोटाच्या आजारापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्याची गरज आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील लोकांनी पाणी उकळून प्यावे. धाब्यावरील जेवण, मांसाहार, व्यसनापासून दूर राहावे. पोटातील विकार किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष करू नये.

उन्हापासून काळजी घ्यावी
डॉ. धनंजय चव्हाण (त्वचारोग तज्ज्ञ) - चेहरा व त्वचेच्या संरक्षणासाठी त्याचे उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे. सूर्याची किरणे जास्त चेहऱ्यावर पडल्यास सुरकुत्या पडतात. त्यासाठी उन्हात फिरताना रुमाल अथवा सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हापासून बचाव हाच त्वचेसाठी उत्तम पर्याय आहे.

वयानुसार आसने करावीत
डॉ. नारायण बनसोडे (विशेष योग चिकित्सक) - योगाभ्यासामधील आसन, प्राणायाम यांमुळे शरीराची बाह्य व अंतर्गत शुद्धता राखली जाते. आत्मा, मन, शरीर यांवर पूर्ण नियंत्रण राहते. सामान्य लोकांनी अध्यात्माच्या शास्त्रानुसार अगोदर श्‍वासावर नियंत्रण असावे. प्रदूषणमुक्त प्राणवायूचे सेवन करावे. वयानुसार आसने करावीत, ऋतूप्रमाणे आहार, विहार घ्यावा व संपूर्ण आयुष्य व्याधीमुक्त करावे.

पिठाळ पदार्थामुळे दात धोक्‍यात
डॉ. महेश माने (दंत रोग चिकित्सक) - वडापाव, पिझ्झा, चॉकलेट आदी विविध पदार्थांत असणारे बारीक केलेले पिठाळ पदार्थ यांमुळे दातांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दात किडण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. दंत चिकित्सा क्षेत्रामुळे दातांच्या आजारासंबंधी असणाऱ्या अनेक गैरसमजांचे निराकरण करता येण शक्‍य झाले आहे.

आयुर्वेदामुळे त्वरित गुण
डॉ. किशोर भंडारे (आयुर्वेद तज्ज्ञ) - आयुर्वेदाची निवड सकारात्मक करावी. केवळ ऍलोपॅथी औषधांचे दुष्परिणाम होतात म्हणून आयुर्वेदाची निवड करू नये. "आरोग्य प्रथम आयुर्वेद प्रथम' हे लक्षात ठेवावे. आयुर्वेदीय औषधांचा गुण उशिरा येतो हा फार मोठा गैरसमज आहे. आयुर्वेदामध्ये अनेक औषधे त्वरित गुण देणारीही आहेत

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.