सकाळ वृत्तसेवा
०५ मे २०१०
नागपूर, भारत
आयुर्वेदिक वेदनानाशक मिश्रित ऍलोपॅथी औषधांचा आठ लाखांचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला. उपराजधानीसह नागपूर विभागात सर्वत्र खुलेआमपणे विक्री असलेली ही औषध पंजाबमधील जे. पी. हर्बल फार्मसीशी (मोहगा) संबंधित असल्याचे तथ्य पुढे आल्याने विभागातर्फे एक पथक पंजाबला पाठविण्यात येत आहे. यानंतर संबंधित कंपनीमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून, कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील सिव्हिल लाइन्स भागातील नलिनी आयुर्वेदिक एजन्सीकडून 5 लक्ष, वर्धा येथील काली, स्वास्तिक, ज्योती आणि रेणुका एजन्सी यांच्याकडून 80 हजार, चंद्रपूर येथून 50 हजार आणि भंडारा येथून 50 हजार रुपये किमतीच्या ही मिश्रित औषधी जप्त करण्यात आली. नागपूर विभागातील या कारवाईनंतर विभागातर्फे राज्य सरकारला पत्र लिहून इतरही जिल्ह्यांत यासारखीच कारवाई करण्याकडे लक्ष वेधले आहे. यासोबतच महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे. नागपूर विभागातील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त अमृत निखाडे यांच्या नेतृत्वात निरीक्षक प्रकाश शेंडे, अतुल मंडलेकर, पुष्पहाल बल्लाल यांनी केली.
गेल्या वर्षी नागपूरसह अनेक जिल्ह्यात जे. बी. हर्बल फार्मसीतर्फे निर्मित ऍक्टिव्ह पेनकिलर, डायबेटिक, बॉडी ग्लो नावाची आयुर्वेदिक औषध मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. नागपूर शहरात नलिनी आयुर्वेदिक कंपनीकडे या औषधांचे वितरक आहेत. 23 मार्च, 2009 रोजी या एजन्सीकडून जप्त औषधांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. 28 मार्च रोजी यासंदर्भातील प्राप्त अहवालात औषधांमध्ये आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथी औषधांचे मिश्रण असल्याचे स्पष्टणे म्हटले आहे. आयुर्वेदिक औषध विकण्यासाठी परवान्याची गरज भासत नाही, मात्र ऍलोपॅथी औषध वापरण्यासाठी परवाना बंधनकारक असतो. रुग्णास दोन्ही औषधांच्या मिश्रणातून तातडीने फायदा होतो. मात्र त्यानंतर शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. यात मानसिक त्रासासह इतरही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ज्या एजन्सीकडे ही औषध असेल त्यांनी परत करण्याचे आवाहनही केले आहे. यासंदर्भातील कारवाई येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होईल, असे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.