सकाळ वृत्तसेवा
२८ नोव्हेंबर २०१०
पुणे, भारत

""अंगावरील कोड हा रोग नसून, केवळ विकार आहे. तो संसर्गजन्य नाही. स्वतः त्या व्यक्तीला किंवा इतरांना त्यामुळे कोणतीही व्याधी होत नाही. पण या विकाराविषयी असलेल्या नकारात्मक भावनेमुळे कोड आलेल्या व्यक्तीला समाजात सामावून घेतले जात नाही. आम्हाला मुख्य प्रवाहात सामील व्हायचे आहे. आम्हाला वेगळे वेगळे पाडू नका,'' अशी भावना व्यक्त केली कोड आलेल्यांसाठी काम करणाऱ्या डॉ. माया तुळपुळे यांनी.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार शुक्रवारी डॉ. तुळपुळे यांना खासदार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया, संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. अनिल कुलकर्णी, सचिव रवींद्र देशपांडे, कार्याध्यक्ष विश्वास देवल, संचालक मंडळ सदस्या मृणालिनी चितळे, ज्येष्ठ समाजसेवक विलास चाफेकर, सुनंदा पटवर्धन आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. तुळपुळे म्हणाल्या, ""समाजाच्या नकारात्मक भावनेमुळे कोड आलेल्या व्यक्तीला मानसिक धक्का बसतो. अगतिकता येते. मूळ रंग जाऊन आलेला रंग स्वीकारणे आम्हालाही सहजसोपे नसते. हे डाग खरे तर निरुपद्रवी असतात, पण जन्मभर ते घेऊन जगणे सोपे नाही. आम्हाला छोटा मदतीचा हात लागतो. तोच "श्वेता' संस्थेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला.''
महाजन म्हणाल्या, ""न्यूनगंड असलेल्या लोकांना समाजासाठी कार्य करणारे लोक आत्मविश्वास देतात. सध्या सामाजिक बांधिलकी कमी झाली आहे. आपण समाजाचा घटक असून, समष्टीत मिसळायचे आहे, ही जाणीव निर्माण झाली पाहिजे.''
कर्वे यांचे काम संतांच्या कामाइतकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामामुळे आज अनेक क्षेत्रांत स्त्रिया खंबीरपणे काम करत आहेत, असे फिरोदिया यांनी सांगितले. डॉ. पुष्पा रानडे यांनी सूत्रसंचालन केले. पद्मजा नलावडे यांनी आभार मानले.
पडद्याआडूनही आम्हाला समजते
बिहारच्या विजयाने लोकप्रतिनिधींनी विकास केला पाहिजे, हे सिद्ध झाले असल्याचे सांगून महाजन म्हणाल्या, ""बिहारच्या निवडणुकांत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. पडद्याआड राहिलो तरी आम्हाला समजते हे त्यांनी दाखवून दिले. समाजात चांगले काम चालू आहे, हे लोकप्रतिनिधींना कळले पाहिजे. त्यासाठी त्यांना अशा कार्यक्रमांना बोलवत जा.''