Print
Hits: 3024

सकाळ वृत्तसेवा
०१ जुन २०१०
कोल्हापूर, भारत

पाण्याच्या बाबतीत संपन्न असलेल्या आणि स्वच्छता अभियानात देशात पहिला आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गॅस्ट्रोची साथ आली आहे. या साथीतून कॉलऱ्याची साथ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस भोगावती काठावरील गावातील लोकांनी आरोग्याची जास्तीत जास्त खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे.

राशिवडे, येवती, बेले या गावात गॅस्ट्रोची साथ सुरू आहे. गेले अनेक दिवस नदीत साठून राहिलेल्या पाण्यात काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्यात आले. कोणतीही प्रक्रिया न करता पाणी पिण्यास पुरवल्यामुळेच ही साथ आल्याचे सांगण्यात येत आहे. टीसीएल पावडर न वापरणे, कमी प्रमाणात वापरणे किंवा निकृष्ट दर्जाची टीसीएल पावडर वापरणे यामुळे ही साथ आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत साथीत तिघांचा बळी गेला आहे. साथ येण्यास संबंधित ग्रामपंचायतीच जबाबदार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यात टाकण्यासाठी टीसीएल पावडर खरेदी करते. त्यावर हजारो रुपये खर्ची पडतात; पण काहीवेळा ती पाण्यात टाकली जात नाही, तर कधी योग्य प्रमाणात ती टाकली जात नाही. खरेदी केल्या जाणाऱ्या पावडरचा दर्जा चांगला नसतो. टीसीएल पावडर खरेदी आणि त्यावर होणारा खर्च हाही एक संशोधनाचा विषय आहे.

साथ आटोक्‍यात - डॉ. वेदक
गॅस्ट्रोची साथ आटोक्‍यात आली आहे. काही रुग्णांमध्ये कॉलऱ्याचे जंतू आढळले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्हा आरोग्य यंत्रणा कोणत्याही संकटाशी सामना करण्यास सज्ज आहे. लोकांनी पाणी उकळून प्यावे. सरकारी रुग्णालयातच तपासणी करून औषधोपचार घ्यावा. औषधे तातडीने घ्यावी. गॅस्ट्रोची लागण झालेली असताना स्थलांतर करू नये. शेतात जाताना योग्य पाण्याचाच वापर करावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी केले आहे. कोणत्याही वेळेला जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.