Print
Hits: 3285

सकाळ वृत्तसेवा
२५ मे २०१०
पुणे, भारत

मानवाला वरदान ठरलेल्या मूळपेशी (स्टेमसेल्स) मातेच्या दुधातही असतात, असा शोध कोल्हापूर येथील ज्येष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी लावला आहे. हा संशोधन प्रबंध ह्यूमन सेल' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मूळपेशींच्या साह्याने बालमृत्यू रोखता येतील, असा दावा यांनी केला आहे.

डॉ. रमेश भोंडे

पुण्याच्या राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडे या संशोधनात सहभागी झाले होते. डॉ. पत्की आणि डॉ. भोंडे या दोघांनी या संशोधनाची माहिती आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

dr sateesh patki

डॉ. पत्की म्हणाले, 'प्रसूतीनंतर बाळाला देण्यात येणारे आईचे दूध ही संजीवनी असते. त्याचे नेमके कारण काय, या प्रश्‍नाचे उत्तर या संशोधनातून मिळते. प्रसूतीनंतर पहिल्या पाच दिवसांत आईच्या दुधातून बाळाला मोठ्या प्रमाणात मूळपेशी मिळतात. बाळासाठी ही जीवन संजीवनी' असते. नवजात बालकांमधील पचन संस्थेच्या रचनेमुळे त्या आतड्यांमधील स्रावांमध्ये नष्ट होत नाहीत; तर रक्ताभिसरणातून विविध अवयवांपर्यंत जातात.

आईच्या दुधात असतात मूळपेशी!

पहिल्या तीन दिवसांमधील घट्ट दुधाला कोलोस्ट्रम' म्हणतात. दोन आठवड्यांतील दूध मध्यम घट्ट आणि त्यानंतर दोन वर्षांपर्यंतचे, असे आईच्या दुधाचे प्रकार आहेत. त्यापैकी "कोलोस्ट्रम'च्या एक मिलिलिटर दुधामध्ये 50 हजार मूळपेशी असतात. तीन दिवसांनंतर दुधात सर्व प्रकारच्या पेशींचे प्रमाण कमी होते. त्यात प्रति मिलिलिटरमध्ये मूळपेशींची संख्या पाच हजार, तर दहा दिवसांनंतर एक मिलिलिटर दुधातून फक्त पन्नास पेशी बाळाला मिळतात, असे डॉ. पत्की आणि डॉ. भोंडे यांनी स्पष्ट केले.

जन्मानंतर पहिल्या पाच दिवसांत बाळ दिवसभरात 80 ते 100 मिलिलिटर दूध प्रति किलोग्रॅम वजनाप्रमाणे घेते. त्यानुसार प्रत्येक दिवशी बाळाला त्याच्या वजनाप्रमाणे पन्नास लाख मूळपेशी मिळतात. मातेचे दूध हेच नवजात बालकाचे खरे अन्न आहे. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला बाहेरील दुधाची आणि पूरक खाद्याची गरज नसते, असेही संशोधनातून सिद्ध झाले आहे. स्तनपान मिळालेल्या बालकांमध्ये जुलाब, श्‍वसनाचे, आतड्यांचे विकार, तसेच कानाचे संसर्ग या आजारांचे प्रमाण कमी असते, असे डॉ. पत्की यांनी सांगितले. स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला पत्की या वेळी उपस्थित होत्या.

स्तनपान 'नैसर्गिक स्टेमसेल थेरपी'
आईच्या दुधातील मूळपेशींचा वापर करून स्वादुपिंडाच्या पेशी, मेंदूतील चेतातंतू आणि हाडांच्या पेशींची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे स्तनपान ही नैसर्गिक स्टेमसेल थेरपी' आहे, असे मत डॉ. सतीश पत्की यांनी व्यक्त केले. याचा उपयोग करून बालकांवर उपचार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मूळपेशी म्हणजे काय?
मूळपेशींमध्ये अमर्याद काळापर्यंत विभाजित होण्याची क्षमता असते. वाढत्या वयाप्रमाणे मूळपेशींची संख्या कमी होते. शरीराच्या कोणत्याही अवयवातील पेशींमध्ये परिवर्तित होण्याची त्यांची क्षमता असते. नैसर्गिक प्रसूतीपेक्षा "प्रीमॅच्युअर डिलिव्हरी' झालेल्या आईच्या दुधात या पेशींची संख्या अधिक असते, असे डॉ. पत्की यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.