सकाळ वृत्तसेवा
११ ऑगस्ट २०१०
पुणे , भारत
रस्त्यावरील अपघातग्रस्तावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने "पुणे शहर अपघात रुग्ण साहाय्य योजना' राबविण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारासाठी दहा हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. 15 ऑगस्टपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. अशी योजना सुरू करणारी राज्यातील ही पहिली महापालिका आहे. महापालिकेच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळत नसल्यामुळे जीव गमवावा लागत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. अथवा रुग्णालयात दाखल करावयाचे झाल्यास आर्थिक अडचणी येतात. परिणाम, अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत वेळेत मिळत नाही. अशा अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळाल्यास त्यांच्यावर प्राथमिक उपचार होऊन जीवदान मिळू शकते, हे लक्षात ठेवून चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात ही योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार करून समितीसमोर मांडल्यानंतर आज एकमताने मान्यता देण्यात आली.
याबाबत माहिती देताना सभागृह नेते नीलेश निकम म्हणाले, ""अपघात झाल्यानंतर रुग्णास खासगी हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ कक्षात दाखल केल्यानंतर पहिल्या 24 तासांमधील उपचाराकरिता झालेला खर्चापैकी जास्तीत जास्त दहा रुपयांची मदत महापालिकेकडून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व खासगी मान्यताप्राप्त आणि महापालिकेत नोंदणी झालेल्या रग्णालयांचा सहभाग राहणार आहे. प्राथमिक मदत मिळाल्यानंतर रुग्णास सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आल्यासच ही मदत मिळणार आहे; परंतु खासगी रग्णालयात पुढील उपचार घेणार असेल, तर त्यांना ही योजना लागू राहणार नाही. रुग्णाच्या नातेवाइकांनी या मदतीसाठी अर्ज करावयाचा आहे. त्यासोबत रुग्णालयाच्या केसपेपरची प्रत आणि पोलिसांची पंचनाम्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या अर्जाची साहाय्य आरोग्यप्रमुख आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून तपासणी करण्यात येईल. त्यानंतर संबंधित रुग्णांना धनादेश दिला जाईल. 15 ऑगस्टपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे.''