सकाळ वृत्तसेवा
२८ एप्रिल २०१०
डॉ विराज शिंगडे
नागपुर, भारत

चार-पाच वर्षांचे वय झाल्यानंतरही स्वतःच्या पायावर उभे न राहू शकणाऱ्या पाचशेवर बालकांना त्यांनी उभे केले, चालायला लावले. नागपुरातील डॉ. विराज शिंगाडे या भल्या माणसाने ही किमया करून दाखविली.
एक हजारांमागे शंभरांवर अर्भक मृत्यूदर असलेल्या गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी शोधग्राम, आम्ही आमच्या आरोग्यासाठी'सारख्या आरोग्यदायी चळवळी जन्माला आल्या. परंतु, याच जिल्ह्यात जन्मतः हात, पाय व इतरही व्यंग घेऊन जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या मोठी आहे. चार-पाच वर्षांचे झाल्यानंतरही ती मुले चालू शकत नाहीत. जमिनीवर घुसत जाणे हीच त्यांची दैनंदिनी, अशा पाचशेवर बालकांच्या हातापायावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या आयुष्य फुलवण्याचे काम डॉ. विराज शिंगाडे यांनी केले. गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या माणुसकीच्या साथीने या योजनेला बळ मिळाले.
सर्व शिक्षा अभियाना'च्या समावेशित शिक्षण उपक्रमात मुलांचे अपंगत्व दूर करण्याची योजना आहे. मेडिकल, मेयोसारख्या बड्या रुग्णालयात गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आदिवासी माणसांनी चिमुकल्यांच्या व्यंगावरील शस्त्रक्रियांसाठी खेटा घातल्या; परंतु थारा मिळाला नाही. अखेर डॉ. शिंगाडे या गरिबांच्या मदतीला धावून आले. भामरागड, सिरोंचा, कोरची, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, देसाईगंज अशा गावातून आलेल्या 510मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. कोणाला क्लब फुट तर कोणी जन्मतः पायाचे अपंगत्व घेऊन आलेला. कोणाला हाडांचे अपंगत्व तर कोणी प्रसूतीदरम्यान पक्षाघात झाल्याने आलेले अपंगत्व, हातांचा वाकडेपणा, पायांचा वाकडेपणा... अशा बालकांवर शस्त्रक्रिया करून डॉ. शिंगाडे शासनाच्या उपक्रमात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपतात. मागील दीड महिना त्यांनी स्वतःच्या सेंट्रल चाइल्ड या खासगी दवाखान्यात केवळ गडचिरोलीतील मुलांवर शस्त्रक्रिया केली. एकाही खासगी रुग्णाला तपासले नाही. डॉ. शिंगाडे यांना शस्त्रक्रियेदरम्यान प्लास्टिक सर्जन डॉ. सुरेश चावरे तसेच भुलतज्ज्ञ डॉ. दीपाली मंडलिक, डॉ. रश्मी शिंगाडे यांनीही मोलाची साथ दिली. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी पी. एस. मोरे, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव हुकरे, संजय नांदेकर, अविनाश पिंपळशेंडे यांची साथ डॉक्टरांना लाभली.
कृतार्थ माउली
मुलचेरा येथील राहुल मंडल हा पाच वर्षांचा मुलगा चालूच शकत नव्हता. अनेक ठिकाणी उपचार झाले; परंतु व्यर्थ. अखेर शासनाच्या या योजनेतून केवळ औषधाचा खर्च घेऊन त्याच्यावर डॉ. शिंगाडे यांनी शस्त्रक्रिया केली. तो आज धावू लागला. त्याच्या आईचे डोळे पाणावले. तिने डॉक्रटांचे पाय धरले. अशी एक नाही, अनेक उदाहरणे आहेत. डॉ. शिंगाडे झोपडपट्टीतील मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करतात. केवळ औषधांचा खर्च करावा हीच त्यांची माफक अट. हा आपला सेवाधर्म कायम सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे.