सकाळ वृत्तसेवा
१४ जुलै २०१०
पिंपरी, भारत
पिंपरी-चिंचवड महापालिका नागर वस्ती विकास योजना विभागातर्फे अपंगांच्या विकासासाठी या वर्षी नवीन अकरा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या वर्षीपासून अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
मागील वर्षी अपंगांसाठी केवळ शिष्यवृत्ती व साधने वाटप या योजना होत्या. या वर्षी नवीन अकरा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांमध्ये अर्थसाहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
योजनांमध्ये अपंगांसाठी कमी उंचीचे टॉयलेट, फोल्डिंग कमोड, खुर्ची, वॉश बेसिन आदी बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. अपंगांना संगणकाचे तसेच एमएससीआयटी, डीटीपी, टॅली आदी संगणकविषयक तसेच व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यवसायासाठी अर्थसाहाय्यही करण्यात येणार आहे. 18 वर्षांपुढील मतिमंदांचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व पालकांना अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. स्वयंरोजगारासाठी उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अंध, अपंग विद्यार्थ्यांना पीएमपीएलचा प्रवास पास मोफत देण्यात येणार आहे. अपंग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. लहान बालकांची थायरॉईड तपासणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसेच इतर रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येणार आहे. अपंगत्वाची शक्यता असलेल्या बालकांची पुढील तपासणी करण्यासाठी व मुळातच अपंगत्व येऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असे नागर वस्ती विकास योजना विभागातर्फे सांगण्यात आले.
शिष्यवृत्तीत वाढ
अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी 40 टक्के अपंगत्व असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे
पहिली ते नववी ः 4 हजार
दहावी ते बारावी ः 5 हजार
प्रथम ते तृतीय वर्षे ः 6 हजार
पदव्युत्तर शिक्षण ः 8 हजार
मतिमंद ः 6 हजार
अपंगांसाठी नवीन अकरा योजना
- Details
- Hits: 6594
0