सकाळ वृत्तसेवा
३० ऑगस्ट २०१०
कोल्हापूर, भारत
अंधांसाठी रोजच्या जीवनात ऑडिओ बुक रीडर अँड रेकॉर्डर (अब्रार) उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रामुळे अंध व्यक्तीही धावत्या जगाबरोबर राहू शकणार असल्याचे शिरीष दारव्हेकर (नागपूर) यांनी सांगितले.
माधव नेत्रपेढीच्या वतीने आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. पार्श्वनाथ बॅंकेचे अध्यक्ष अभय गांधी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. पार्श्वनाथ को-ऑप. बॅंक सभागृहात कार्यशाळा झाली.
श्री. दारव्हेकर यांनी सांगितले, की अब्रार हे यंत्र म्हणजे चालते-बोलते खिशाच्या आकाराचे ग्रंथालयच आहे. यामध्ये रेकॉर्डिंगची सोय आहे. तसेच 16 एम.बी.पासून 16 जे.बी.पर्यंतची माहिती साठवता येते. अंध व्यक्तींना यामुळे शैक्षणिक, सामाजिक, सर्व प्रकारची माहिती ऐकता येणार आहे. यंत्राद्वारे ऐकताना मागे, पुढे जाता किंवा थांबता येणार आहे. गाणी, पुस्तके, साहित्य यातून ऐकता येऊ शकते. हे यंत्र व्यक्तिगत किंवा सामूहिक पद्धतीनेही वापरता येते.
ते म्हणाले, ""अब्रार यंत्राची निर्मिती सक्षम संस्थेने केली आहे. हे यंत्र लुई ब्रेल यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त अर्पण केले आहे.''
यावेळी डॉ. चेतन खारकांडे, नॅबचे ऍड. उदय शिरगोपीकर, गिरीश करडे, प्रा. मनोहर वासवानी, प्रा. अंजली निगवेकर उपस्थित होते.
दरम्यान, हे यंत्र माधव नेत्रपेढी, रविवार पेठ येथे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले. अनिरुद्ध मुरुमकर यांनी सूत्रसंचालन केले. उपेंद्र सांगवडेकर यांनी आभार मानले.
अंधशाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थीही कार्यशाळेत सहभागी झाले होते.