सकाळ वृत्तसेवा
०९ डिसेंबर २०१०
ओतूर, भारत
वयाच्या चौथ्या वर्षी त्याची दृष्टी गेली. त्याच वर्षी त्याचे मातृछत्रही हरपले. आजोबांकडे आश्रयास आलेल्या या मुलाच्या अंधारविश्वात विहिरीवर बसविलेल्या 'ऑइल इंजिन'ने प्रकाशाचा कवडसा निर्माण केला. कुतूहलापोटी इंजिनाची चाचपणी करणाऱ्या या मुलाचे ऑइल इंजिन हेच भावविश्व बनले. यातूनच त्याला आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग सापडला. केवळ आवाजावरून इंजिनातील बिघाड जाणण्याचे कसब या मुलामध्ये निर्माण झाले. स्पर्श करून हा मुलगा इंजिनाची देखभाल व दुरुस्ती करू लागला. तीन दशकांच्या खडतर तपश्चर्येनंतर "ऑइल इंजिन मेकॅनिक' म्हणून या मुलाने संपूर्ण राज्यभरात नावलौकिक मिळविला.
गाडीवान मळा (ओतूर) येथे राह णारे सबाजी भाऊ हाडवळे असे या "डोळस' मेकॅनिकचे नाव आहे. त्यांचा जीवनप्रवास हा समाजातील डोळस व्यक्तींच्या दृष्टीनेदेखील "दीपस्तंभा'सारखा आहे. राजुरी (ता. जुन्नर) हे त्यांचे मूळ गाव. दृष्टिहीन व मातृछत्र हरपलेल्या सबाजीचा सांभाळ त्याचे आजोबा बजाबा नदुजी डुंबरे यांनी केला. श्री. डुंबरे यांचे गाडीवान मळ्यात शेतातच घर आहे. जवळच असलेल्या विहिरीवर ऑइल इंजिन बसवून ते बागायती शेती करीत असत. अंधारविश्वात चाचपडत वावरणाऱ्या सबाजीचे "भुक-भुक' आवाज करीत पाणी खेचणाऱ्या ऑइल इंजिनबाबत कुतूहल निर्माण झाले. स्पर्शाने तो ऑइल इंजिनचा आकृतिबंध आपल्या मेंदूत साठवू लागला. हळूहळू त्या इंजिनची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आली. ताट्या बांधणे, पाया, पाइपलाइन, विहिरी खोदणे व सिंचन करण्याची कामेदेखील तो करू लागला.
1980 पासून त्यांनी इतर शेतकऱ्यांची ऑइल इंजिने दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू केला. या कामी त्यांना ज्येष्ठ मेकॅनिक शंकरराव संभूस यांचे मार्गदर्शन लाभले. दर वर्षी ते सुमारे 25 इंजिनांची दुरुस्ती करत असत. परिसरात वीज आल्यानंतर ऑइल इंजिने वापरण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र जनरेटर, मळणी व फवारणी यंत्र, लेलॅंड ट्रकचे इंजिन ते लीलया दुरुस्त करून दरमहा सुमारे 15 हजार रुपये उत्पन्न मिळवितात. इतर कोणत्याही मेकॅनिकला न जमणारे इंजिन दुरुस्त करण्याची त्यांची ख्याती आहे. त्यांचा नावलौकिक ऐकून पुणे, मुंबई, नाशिक, नगर परिसरातील न दुरुस्त होऊ शकणारी इंजिने दुरुस्त करण्यासाठी त्यांना गाडी पाठविली जाते. भंगारात निघालेली 7-8 इंजिने दुरुस्त करून त्यांनी त्याची विक्री केली आहे. 1994 मध्ये त्यांनी भंगारात निघालेला ट्रक विकत घेऊन त्याची दुरुस्ती केली व पुढील दहा वर्षे ऊस वाहतुकीचा व्यवसाय केला. त्यांनी स्वतःच्या घराची उभारणीदेखील स्वतःच केली आहे. त्यांची पत्नी हौसाबाई शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावते.
"विघ्नहर' कारखान्यातील निरुपयोगी ठरलेले इंजिन दुरुस्त केल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष सोपान शेरकर यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. हा अपवाद वगळता अद्याप कोणतेही पारितोषिक मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.