महाराष्ट्र टाइम्स
०२ नोव्हेंबर २००९
मुंबई, महाराष्ट्र
मुंबईमध्ये पुन्हा एकदा हिवतापाने आपला हिसका दाखवला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये हिवतापाने बळी घेतलेल्यांची संख्या ५७वर गेली आहे. एकाच महिन्यामध्ये एखाद्या साथीच्या रोगाने इतकेजण मृत्युमुखी पडतात, ही गोष्ट निश्चितच चिंताजनक आहे. ज्या शहरामध्ये अद्ययावत वैद्यकीय सोयी आहेत, जिथे विविध विषयांतल्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या मोठी आहे, केईएम, नायर, टिळक आणि जे. जे. यासारखी मोठी हॉस्पिटले आहेत, औषधांचा तुटवडा सहसा जाणवत नाही, अशा शहरामध्ये हिवतापाच्या साथीने एकाच महिन्यामध्ये ५७ आणि चार महिन्यांमध्ये २५० बळी जातात याचा अर्थ शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर काहीतरी चुकीचे घडते आहे. स्वच्छता राखणे, कचऱ्याचे ढीग वेळेवर उचलून नेणे, सांडपाणी साठू न देणे, म्हणजेच डासांच्या उत्पत्तीस पोषक असे वातावरण कुठेही तयार होणार नाही याची खबरदारी घेणे या गोष्टी शहराच्या सर्वच भागांमध्ये पुरेशा प्रमाणात होत नाहीत. महापालिकेच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या ठिकाणी बांधकामे चालू आहेत, अशाच ठिकाणी हिवतापाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. कोणत्याही बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठून राहते आणि हे साठलेले घाण पाणी म्हणजे डासांच्या निमिर्तीची आगरेच बनून जातात.
हिवतापाचा प्रसार डासांमार्फतच होत असल्याने जिथे मोठ्या प्रमाणावर डास तयार होतात, तिथे हिवताप पसरण्याची संभाव्यता वाढते. सुदैवाची बाब एवढीच की आजमितीस ही साथ संपूर्ण शहरभर नाही, तर ती मुंबईतील आठ वॉर्डांमध्ये साथ पसरली आहे. या वॉर्डांमध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अशा कामांमध्ये मराठी माणूस अभावाने दिसत असल्याने परप्रांतातून मजूर आणले गेले आहेत. हे परप्रांतातले मजूरच हिवतापाच्या साथीला जबादार आहेत, असे सांगितले जात आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही ठिकाणी कामाला सुरुवात करताना अशा बाहेरून आलेल्या प्रत्येक मजुराची तपासणी करावयाची आणि त्याला 'हेल्थ कार्ड' द्यावयाचे, असे महापालिकेने ठरविले आहे. हिवतापाच्या प्रसाराला आळा घालण्याचा हा एक मार्ग आहे, यात वादच नाही. परंतु मुळातच हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरेल असे वातावरण कुठेच राहणार नाही, अशी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तशी ती घेतली तर हिवतापाच्या प्रसाराच्या मुळावरच घाव घातल्यासारखे होईल. बाकी उपाय हे वरवरच्या मलमपट्टीसारखे आहेत. ते उपयोगी ठरतात; पण साथीला अटकाव करण्यासाठी अशा मलमपट्ट्या नाहीत, तर मुळावरच घातलेला घाव उपयोगी ठरतो, याचा विसर पडू देऊ नये.
हिवतापाचा उच्छाद!
- Details
- Hits: 3939
0