Print
Hits: 2730

सकाळ वृत्तसेवा
२६ जुलै २००९
पुणे, महाराष्ट्र

"स्वाइन फ्लू'ची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्याची यंत्रणा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गट तयार करण्यात आला आहे. यात परिचारिका, आरोग्यसेविकांचा समावेश आहे.

जगभरात प्रसार झालेल्या "स्वाइन फ्लू'चा विद्यार्थ्यांना संसर्ग होत असल्याने पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या आरोग्य खात्याचे संचालक डॉ. डी. एस. डाखुरे यांनी महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयास भेट दिली. "स्वाइन फ्लू' झालेल्या प्रत्येकाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचण्याची कोणतीच यंत्रणा सध्या महापालिका राबवत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही संशयित स्वतःहून डॉ. नायडू रुग्णालयात होतात. मात्र, रुग्णालयात न येणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्याबाबत डॉ. डाखुरे म्हणाले, ""या रोगाचा संशय असणाऱ्यांना रुग्णालयात बोलावून घेण्यात अनेक धोके आहेत. घर ते रुग्णालय या प्रवासात त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनाही त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी "स्वाइन फ्लू'च्या संशयित रुग्णाच्या घरी जाऊन त्याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक आहे.''

"एच1एन1' या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती आरोग्यविभाग प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी यांनी दिली. ते म्हणाले, ""स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधित रुग्णाला या रोगाची लक्षणे जाणवू लागण्याआधी एक दिवसापासून तो ज्याच्या सानिध्यात आला, त्या सर्वांची सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांना ही माहिती पाठवून त्यांच्या परिसरातील संशयित रुग्णांचा तपास करण्याची जबाबदारी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सुरवातीला वैद्यकीय अधिकारी संबंधितांची आरोग्य तपासणी करेल. त्याला "स्वाइन फ्लू'ची लक्षणे आढळल्यास घरातच इतरांपासून वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. पुढील आठ दिवस कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, असेही त्यांना सांगण्यात येईल. त्याच दिवसापासून त्यांना परिचारिकांमार्फत औषधाचा डोस दिला जाईल. त्यामुळे रुग्णाची रोज तपासणीही होईल.''

या प्रकल्पामुळे रुग्णालयावरील ताण कमी होऊन, रुग्णांच्या आरोग्याची नियमित तपासणीही शक्‍य होणार आहे, असे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.