सकाळ वृत्तसेवा
१० ऑगस्ट २००९
पुणे, महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब माने
स्वाइन फ्लू मुळे पुण्यातील ससून रुग्णालयात आज (सोमवारी) सकाळी सात वाजता बाबासाहेब माने (३६) या डॉक्टरचा व चेन्नईत चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लू मुळे झालेला हा देशातील सहावा व पुण्यातील तिसरा मृत्यू आहे.
डॉ. माने यांच्या पत्नीनांही स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्या नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाबासाहेब माने हे पुण्यातील टिंगरेनगर भागातील रहिवासी असून, ते आयुर्वेदीक डॉक्टर होते. डॉ. माने यांना सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्यामुळे नागपूर चाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना नायडू रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. नायडू रुग्णालयात गेले असता तेथे तपासणीसाठी गर्दी असल्याने तेथेच ते चक्कर येऊन पडल्याने त्यांना बुधराणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी बुधवारी (ता. ५) त्यांचे नमुने पाठविण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा नमुन्यांचा अहवाल आला व त्यात त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाल्याने शुक्रवारी (ता.७) त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससूनमध्ये दाखल केल्यानंतर सुरवातीला त्यांच्या मापाचे व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने त्यांच्या पत्नीनेच दोन तास व्हेंटिलेटर धरुन ठेवले व त्यांनीच त्याची काळजी घेतली. शुक्रवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते व त्यांना टॅमिफ्लू हे औषधही देण्यात आले होते. पण, शेवटी आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना सहा वर्षाची मुलगी व एक वर्षाचा मुलगा आहे.
चेन्नईत बालकाचा मृत्यू चेन्नईत मृत्यू झालेला मुलगा चार वर्षाचा असून, तो चेन्नईतील पहिला संशयित रुग्ण होता. दक्षिण चेन्नईत असणाऱ्या अक्षया शाळेत तो शिकत होता, यामुळे शाळा सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला.