सकाळ वृत्तसेवा
२० जुलै २००९
पुणे, महाराष्ट्र
जगभरात प्रसार झालेल्या "स्वाइन फ्लू' या रोगाचे राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. राज्यातील या रुग्णांची संख्या ३९ झाली असून, त्यापैकी २२ रुग्ण पुण्यातील आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये; या रोगाची लक्षणे आढळल्यास थेट महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई येथे "स्वाइन फ्लू'चे १५ रुग्ण सापडले आहेत. ठाणे येथे दोन आणि नाशिक येथे एक रुग्ण आढळला आहे. राज्यातील या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. पुण्यातील अभिनव विद्यालयातील अकरा विद्यार्थ्यांना या रोगाची लागण झाली आहे. विद्यालयातील आणखी एका विद्यार्थ्याला स्वाइन फ्लू झाल्याचे रविवारी (ता. १९) "राष्ट्रीय विषाणू संस्था' (एनआयव्ही) यांनी दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
विद्यालयातील स्वाइन फ्लू झालेल्या मुलांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक औषध देऊन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यालयातील इतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.
"स्वाइन फ्लू'ची लक्षणे
"एच१एन१' या या विषाणूंमुळे "स्वाइन फ्लू'चा संसर्ग होतो. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी ही नेहमीच्या फ्लूसारखीच त्याची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
प्रसार टाळण्याचीकाळजी
संसर्ग झालेल्या व्यक्तीने इतरांपासून स्वतःला दूर ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी जाणे किंवा प्रवास करणे टाळावे. खोकताना, शिकताना तोंडावर हात न धरता "टिश्यू पेपर' धरावा.
रोग निदान
याचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. पुण्यातील "राष्ट्रीय विषाणू संस्था' (एनआयव्ही) आणि दिल्लीतील "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस' (एनआयसीएडी) येथे प्रामुख्याने या सुविधा आहेत.
स्वाइन फ्लू'चे राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात
- Details
- Hits: 3126
0