सकाळ वृत्तसेवा
२३ जुलै २००९
पुणे, महाराष्ट्र

कर्वे रस्त्यावरील अभिनव विद्यालयापाठोपाठ (इंग्रजी माध्यम) आता सेवासदन (दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशेजारील) आणि सिंबायोसिस प्राथमिक शाळेतील (प्रभात रस्ता गल्ली क्रमांक १५) प्रत्येकी एका विद्यार्थ्याला "स्वाइन फ्लू'ची लागण झाल्याचे गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. दोन्ही शाळा उद्यापासून (ता. २४) आठ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने शाळांना केल्या आहेत.
जगभर प्रसार झालेल्या "स्वाइन फ्लू'च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अभिनव विद्यालयातील पाचवी आणि आठवीच्या काही विद्यार्थ्यांपुरता मर्यादित असलेला "एच१एन१' या विषाणूंचा संसर्ग आता इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सेवासदन आणि सिंबायोसिस शाळेतील विद्यार्थ्यांना या विषाणूंचा संसर्ग झाल्याने ही बाब पुढे आली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नाकातील आणि घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्याचा अहवाल रात्री उशिरा मिळाला. त्यात या दोन्ही विद्यार्थ्यांना "स्वाइन फ्लू'ची लागण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत राज्याच्या आरोग्य खात्यातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. आर. आर. कट्टी म्हणाले, ""स्वाइन फ्लूची लागण झालेल्याच्या संपर्कात आलेल्यांनी घराबाहेर पडू नये. त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका आहे. शाळेतील मुले रिक्षा, खासगी शिकवण्या, क्रीडांगण या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यातून या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. या दोन वेगळ्या शाळांतील मुलांना या रोगाचा संसर्ग होण्यामागे ही कारणे आहेत.''
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी म्हणाले, ""स्वाईन फ्लूची लागण झाल्याने उद्यापासून संबंधित दोन्ही शाळा पुढील आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. उद्या त्याबाबतचा आदेशही देण्यात येणार आहे.''
पुण्यात २२ जूनला "स्वाइन फ्लू'चा पहिला रुग्ण सापडला. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ३४ झाली आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर चर्चा झाली. उपमहापौर चंद्रकांत मोकाटे यांनी या विषयाकडे लक्ष वेधले. त्यावर डॉ. परदेशी यांनी, आजार आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली; तर मोकाटे यांनी रुग्णालयांच्या परिसरातील दुरवस्था आणि अस्वच्छतेबाबतही उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन परदेशी यांनी दिले.
“स्वाइन फ्लू'ची लक्षणे”
"एच१एन१' या विषाणूंमुळे "स्वाइन फ्लू'चा संसर्ग होतो. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी ही नेहमीच्या फ्लूसारखीच त्याची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
प्रसार टाळण्याची काळजी
संसर्ग झालेल्या व्यक्तीने इतरांपासून स्वतःला दूर ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी जाणे किंवा प्रवास करणे टाळावे. खोकताना, शिंकताना तोंडावर हात न धरता "टिश्यू पेपर' धरावा.
रोगनिदान याचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. पुण्यातील "राष्ट्रीय विषाणू संस्था' (एनआयव्ही) आणि दिल्लीतील "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस' (एनआयसीडी) येथे प्रामुख्याने या सुविधा आहेत.
"स्वाइन फ्लू'ही बरा होतो
योग्य औषधोपचाराने "स्वाइन फ्लू'ही बरा होतो. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे सरकारी रुग्णालयांना मुबलक प्रमाणात औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय, औंध येथील शासकीय आणि पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे त्यासाठी उपचाराची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) मार्गदर्शन केल्याप्रमाणे येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.