सकाळ वृत्तसेवा
१० फ़ेब. २००९
शारीरिक प्रतिकूलतेशी संघर्ष करत असतानाही उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या, ती साकार होणार हा विश्वास बाळगत वास्तवाला सामोरे जाणाऱ्या अनुभवांनी मंगळवारी प्रेक्षक थरारून गेले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त "अनिता अवचट फाउंडेशन'तर्फे दिल्या जाणाऱ्या "संघर्ष सन्मान पुरस्कार' वितरणाचा समारंभ प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पार पडला. रत्नागिरी परिसरात "गुरुप्रसाद संस्थे'च्या माध्यमातून एड्स तसेच एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणारे डॉ. देवदत्त गोरे आणि स्वतः दृष्टीहीन असूनही अंधांसाठी काम करणाऱ्या सकीना बेदी यांना हे पुरस्कार देण्यात आले. या वेळी डॉ. अनिल अवचट व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी डॉ. गोरे आणि बेदी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा परिचय प्रेक्षकांना घडवला.
डॉ. गोरे म्हणाले,""मी स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहे. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, हे कळल्यावर साहजिकच धक्का बसला. एक वेळ अशी होती की मी कोणत्याही क्षणी मरणार असे वाटत होते. उपचार सुरू होते. या काळात मी ज्ञानेश्वरी वाचली आणि पंढरपूरला जाण्याची ओढ वाटू लागली. पंढरपूरला जातानाचा प्रवास हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. माझे आयुष्य आणि दृष्टीकोन बदलून गेला. नामस्मरणात मी रमलो. या काळात सात वर्षे मी घरात बसून काढली ती केवळ माझा विश्वास, पत्नी आणि कन्येची साथ आणि नातेवाईक, स्नेही यांनी दिलेले पाठबळ यांच्या आधारावर. त्यातूनच जिद्द निर्माण झाली आणि मी पुन्हा जगायला लायक झालो. या आजाराचा अनुभव स्वतः घेतल्याने समदुःखी रुग्णांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि "गुरुप्रसाद संस्था' उभी राहिली.''
सकीना बेदी म्हणाल्या,""माझ्या आयुष्याचे कोडे जन्मापासून पडलेले होते. पण कुटुंबियांच्या पाठिंब्याने मी सावरले. शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही, हे मला फार लवकर कळले आणि आपण कुणावरही अवलंबून राहता कामा नये, याचीही खूणगाठ मी बांधली. प्रारंभी मला अनेक शाळांनी प्रवेश नाकारला. पण सकारात्मक विचार मी सोडले नाहीत आणि यशस्वी झाले. "टाटा इन्स्टिट्यूट' मध्ये काम करायचे मी आधीच ठरवले होते. तिथल्या कामातून मला माझी गरज कुणाला आहे, हे समजले आणि मला दिशा मिळाली. "जागृती अंध विद्यालया'च्या माध्यमातून माझे काम सुरू झाले आहे. अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणारी इंग्रजी माध्यमाची शाळा हे माझे स्वप्न आहे''.
गोडबोले यांनीही मनोगत मांडले.